‘शिक्षण क्षेत्रातील भरती निवडणुकीनंतर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 05:55 AM2017-01-17T05:55:33+5:302017-01-17T05:55:33+5:30
राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेर पूर्ण होणार
नाशिक : राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेर पूर्ण होणार असून, निवडणूक आचारसंहितेनंतर शाळांमधील रिक्त पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.
नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तावडे यांनी विविध समस्या समजावून घेतल्या.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खा. हरिश्चंद्र चव्हाण, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आचारसंहिताभंगाची तक्रार
मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले. हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार पदवीधर मतदारसंघातील उमेदवार राजू देसले यांनी निवडणूक आयोगाक डे केली आहे.
उपरोक्त बैठक होणार असल्याने बैठकीचे चित्रीकरण करण्याची विनंती स्थानिक प्रशासनाला केली होती. परंतु, प्रशासन सरकारमधील मंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे राजू देसले यांनी सांगितले.