खाण घोटाळ्याचा सीबीआय चौकशीचा निर्णय अहवालानंतर
By admin | Published: June 27, 2017 01:57 AM2017-06-27T01:57:10+5:302017-06-27T01:57:10+5:30
एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे देण्याचा अद्याप तरी कोणताही विचार नाही. आतापर्यंत गोवा पोलिसांकडूनच संबंधितांची चौकशी सुरू आहे. एसआयटीची चौकशी योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने सुरू आहे.
अहवाल मिळाल्यानंतरच हे प्रकरण सीबीआयकडे द्यायचे की एसआयटीकडेच ठेवायचे हे ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले. मागील २० दिवसांत खाण घोटाळा प्रकरणातील तपासाने वेग घेतला आहे. खाण कंपन्यांना समन्स बजावून पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. काही कंपन्यांच्या संचालकांनीथेट अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे आणि बहुतेकांना अंतरिम जामिनही मिळाला आहे.
साळगावकर खाण कंपनीचे अर्जून साळगावकर यांना तर समन्स न बजावताच त्यांच्या कार्यालयातून एसआयटीचे पथक आपल्या कार्यालयात घेऊन गेले होते. त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू असतानाच साळगावकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले होते.