‘राजीनामास्त्रा’नंतर कामतांची मनधरणी
By admin | Published: May 4, 2017 05:04 AM2017-05-04T05:04:34+5:302017-05-04T05:04:34+5:30
ज्येष्ठ नेते-माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता थेट दिल्लीहून
मनोहर कुंभेजकर / मुंबई
ज्येष्ठ नेते-माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता थेट दिल्लीहून सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुजरातचे प्रभारी म्हणून कामत यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारलेला असला तरी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा आणि राजस्थानचे प्रभारी म्हणून त्यांनी दिलेला राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अजून तरी स्वीकारलेला नाही. सध्या भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामत यांनी पुन्हा पक्षकार्यात जोमाने सहभागी व्हावे, यासाठी दिल्लीहून प्रयत्न सुरु झाले आहे.
कामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत काँग्रेसचे भवितव्य काय असेल? यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता खाजगीत चर्चा रंगू लागल्या आहेत. विद्यार्थीदशेपासून काँंग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या कामत यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात आहेत. दर शनिवार आणि रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत त्यांना अंधेरी (प) डी. एन. नगर येथील वर्सोवा पोलीस ठाण्यालगत असलेल्या त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असे. विशेष म्हणजे अजूनही ही गर्दी कमी झालेली नाही. तथापि, त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि कार्यकर्ते सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत.
मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीबद्दल कामत कमालीचे नाराज होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले होते. याबाबत त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेवून ही बाब त्यांना सांगितली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गुरुदास कामत हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असतांना त्यांच्या नेतृबाखाली मुंबई महानगर पालिकेत काँग्रेसने ८९ जागा जिंकल्या होत्या, हे विसरता येणार नसल्याचे मुंबईतील एका वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. कामत यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला काँग्रेसच्या मुंबईच्या प्रक्रियेत डावल्यामुळे मुंबईचे पडसाद राज्यात उमटले. अलीकडेच राज्यात झालेल्या विविध ठिकाणच्या महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे मातब्बर नेते आहेत, त्यांच्या नेमणूका कामत यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना केल्या होत्या, अशी माहितीही काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.
राहुल गांधी आतातरी लक्ष देणार का?
२०१२ च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे ५१ नगरसेवक निवडून आले होते,आणि २०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ३१ नगरसेवक विजयी झाले, हे विशेष. काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर कामत भाजपात जाणार अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु त्यांनी मात्र या वृत्ताचे खंडन करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सुतोवाच केले होते.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना कामत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेसचे सर्व ६ खासदार निवडून आले होते. सध्याच्या मुंबई काँग्रेसच्या दिशाहीन अवस्थेला आणि ढासळत्या आलेखाकडे राहुल गांधी आता तरी लक्ष घालणार का? कामत यांच्यासारख्या निष्ठावान आणि अनुभवी नेत्याशी चर्चा करून डावललेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणून मुंबई काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार का? असे प्रश्न मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.