१२ वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आईवडिलांना बसला जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:15 PM2022-06-08T18:15:13+5:302022-06-08T18:15:30+5:30
दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच तो इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली.
पुणे - बुधवारी बारावी परिक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी राहणारा निखिल लक्ष्मण नाईक, वय 19, रा. श्रावणधारा वसाहत याने बारावीत नापास झाल्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खुपच उत्सुक होता.
दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच तो इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली. खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे, वय 30 यांच्या अंगावर तो पडला. यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला. लोणारे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रिकेटची आवड असलेल्या निखिलने बाॅडी बनवण्यासाठी जीम सुरू केली होती. तो शांत स्वभावाचा होता. निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे.
निखिलच्या जाण्यामुळे श्रावणधारा वसाहतीमधील महिलांनी दुःख व्यक्त केले. सुरुवातील झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहीली आहे. कष्टकरी कुटूंबातील आशेचा किरण असलेला तरूण मुलगा गेल्याने सर्वच महिला भावुक झाल्या होत्या.