मुंबईत परतताच पंकजांची नाराजी दूर
By Admin | Published: July 16, 2016 03:37 AM2016-07-16T03:37:04+5:302016-07-16T03:37:04+5:30
सिंगापूरमध्ये असताना इकडे मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्याने टिष्ट्वट करून नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत परतताच नरमाईचा
मुंबई : सिंगापूरमध्ये असताना इकडे मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्याने टिष्ट्वट करून नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत परतताच नरमाईचा सूर लावत आपण नाराज नसल्याचे सांगितले. जलसंधारण मंत्री राम शिंदे हे आपल्या भावासारखे असल्याचे सांगत त्यांनी भेटीला आलेल्या शिंदेंना शुभेच्छादेखील दिल्या.
पंकजा काल रात्री उशिरा सिंगापूरहून परतल्या. आज दिवसभर त्यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होती. खा. प्रीतम मुंडे, आ.आर.टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे आणि बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते मोठ्या संख्येने हजर होते. मंत्री शिंदे हेदेखील दुपारी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले आणि त्यांच्याशी चर्चा केली. पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, मी नाराज नाही. पंकजा मुंडे परतल्यानंतरच आपण पदभार स्वीकारू, अशी घोषणा शिंदे यांनी केली होती. मात्र, गुरुवारी दुपारी शिंदे यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तशी सूचना केली होती, असे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)