घोटाळेबाज ठेकेदार बाद
By admin | Published: November 2, 2016 01:52 AM2016-11-02T01:52:49+5:302016-11-02T01:52:49+5:30
नालेबांधणीचे काम मिळवणाऱ्या आरपीएस इंफ्रा प्रोजेक्टस या कंत्राटदाराला अखेर महापालिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
मुंबई : रस्ते दुरुस्तीच्या कामात घोटाळेबाज ठरल्यानंतरही नालेबांधणीचे काम मिळवणाऱ्या आरपीएस इंफ्रा प्रोजेक्टस या कंत्राटदाराला अखेर महापालिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यापूर्वी पालिकेने याच कंत्राटदाराला दिलेले उड्डाणपूल बांधण्याचे कंत्राट न्यायालयाच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहे.
रस्तेदुरुस्तीच्या ३५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आरपीएस इंफ्रा प्रोजेक्टस हा ठेकेदार दोषी आढळला आहे. त्याच्या विरोधात पालिकेने गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियाही सुरू केली. मात्र ही कारवाई सुरू असतानाच या कंत्राटदाराला दोन उड्डाणपूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आले. पालिकेच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर हे काम रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार ते काम रद्द केल्यानंतर त्यापाठोपाठ पालिकेने एप्रिल महिन्यात चेंबूर आणि मानखुर्द परिसरात नाले रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम दिले होते. हे कामही आता रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. मात्र घोटाळेबाज ठेकेदाराला काम देऊन ते रद्द करणे या प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने उड्डाणपुलापाठोपाठ नालेबांधणीचे कामही लांबणीवर पडले आहे. (प्रतिनिधी)
>नाल्याचे रुंदीकरण रखडले
या कंत्राटदाराचे काम रद्द करण्याबाबत पालिका प्रशासनाने विधि विभागाचा अहवाल मागवला होता. त्यावर
हे कंत्राट तत्काळ रद्द करावे अशी शिफारस विधि विभागाने जुलै महिन्यात केली होती.
त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पालिकेने हे काम रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला. पालिकेच्या या दिरंगाईमुळे या नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे.