सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस ‘गोड’ होणार
By admin | Published: June 13, 2015 10:45 PM2015-06-13T22:45:32+5:302015-06-13T22:45:32+5:30
दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर १५ जूनला राज्यातील शाळा सुरू होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू
पुणे : दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर १५ जूनला राज्यातील शाळा सुरू होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून त्यांचे फुले देऊन स्वागत करण्याबरोबर माध्यान्ह भोजनात गोडधोड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एकही विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाशिवाय राहणार नाही, याची आम्ही काळजी घेतली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७२९ शाळा आहेत. या शाळांची पहिल्या दिवसाची तयारी सुरू आहे. शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजिण्यासाठी शासनाने ९ जूनला अध्यादेश काढून काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात या पहिल्या दिवसाच्या स्वागताची तयारी झाली असल्याचे शिक्षण विभागाचे पशिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.
३ लाख ८४ हजार ६०३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते ८ वीच्या ३ लाख ८४ हजार ६०३ विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थपान समितीच्या उपथिस्तीत मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात येणार आहेत. मराठी माध्यमाच्या सर्वाधिक ४ लाख ६० हजार २९१ विद्यार्थ्यांना, उर्दू माध्यमाच्या ७ हजार ३४९ विद्यार्थ्यांना, इंग्रजी माध्यमाच्या १३ हजार ९३२ व हिंदी माध्यमाच्या ३ हजार ३१ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटण्यात येणार आहेत. हिंदी माध्यमाचे फक्त हवेली तालुक्यात ३ हजार ३१ विद्यार्थी आहेत.
माझी शाळा आदर्श
व आनंददायी करीन
- ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थपान समिती सदस्य यांची एकत्र बैठक घेऊन सर्व शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देणारी प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याच्या सूचनाही
शाळांना दिल्या आहेत.
शाळापूर्व दिनी घर भेट अन् पदयात्रा
-१४ जून रोजी शाळा पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यात घरभेटी व शैक्षणिक पदयात्रा काढण्यात येणार आहेत.
-यात सकाळी ७ वाजता सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून प्रवेशपात्र बालकांची याची ग्रामपंचायत तसेच शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
-त्यानंतर ध्वनिवर्धकावर सोमवारी आपल्या बालकांना सकाळी ७ वाजता शाळेत पाठविण्याची विनंती करून प्रवेशपात्र बालकांची यादी घोषित करण्यात येणार आहे.
-शिक्षकांचे गट करून घरभेटी दिल्या जाणार आहेत. यात त्या घरात प्रवेशपात्र बालक असेल तर त्याचे अर्ज भरून सोमवारी शाळा सुरू होणार असल्याचे सांगण्यात
येणार आहे.