शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 11:36 AM2023-09-02T11:36:04+5:302023-09-02T11:37:17+5:30
maratha reservation protest: छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांशी चर्चा केली.
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, गोळीबार केला. यामुळे राज्यभरातील वातावरण तापलेले असून या आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची पावले जालन्याला वळू लागली आहेत. सकाळीच छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही काहीवेळापूर्वी मुंबईहून जालन्याला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार आहे. हे दोन्ही नेते जालन्याला जात आंदोलन स्थळी आणि जखमी आंदोलकांची भेट घेणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांशी चर्चा केली. अंतरवाली सराटी येथील लाठीहल्ला, गोळीबारीचे आदेश देणाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, पुढचा टप्पा कसा असेल ते शासनाने तातडीने सांगावे, असे आव्हान संभाजीराजे यांनी सरकारला दिले आहे.
जरांगे यांना अश्रू अनावर
छत्रपती संभाजी महाराज यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांसह जखमी महिला, वयोवृद्धांसह नागरिकांची चौकशी केली. शिवाय आंदोलनस्थळी ते भूमिका मांडत असताना आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना आश्रू अनावर झाले होते. त्यावेळी आता रडायचं नाही लढायचं असे छत्रपती संभाजी महाराज म्हणताच उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.