शरद पवारांनी मविआबाबत केलेल्या त्या विधानानंतर संजय राऊत स्पष्टच बोलले, एकत्र लढण्याबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:31 AM2023-04-24T10:31:47+5:302023-04-24T10:32:17+5:30
Sanjay Raut: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, या शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे
२०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार. एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाहीस असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. तसेच एकीकडे वज्रमुठ सभांमधून ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत असले तरी दुसरीकडे मविआमध्ये अंतर्गत कुरबुरी असल्याचा दावा केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी भक्कम आहे. महाविकास आघाडी तुटावी असं शरद पवार यांना वाटत नाही. महाविकास आघाडीबाबत शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष वज्रमुठ सभांच्या माध्यमातून आपलं ऐक्य दाखवत आहेत. आता आता १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करत आहे. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाही. जागावाटप आणि इतर काही मुद्दे महत्त्वाचे असतात. याबाबत अजून चर्चा केलेलीच नाही, त्यामुळे आघाडीबाबत आजच कसं सांगणार, असे शरद पवार म्हणाले होते.