Maharashtra Politics: शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:01 IST2022-09-26T16:00:27+5:302022-09-26T16:01:41+5:30
शिवसेनेनंतर आता मनसेनेही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र घेण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश!
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठीच गळती लागली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवकांपासून पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाकडूनही तशाच प्रकारचे पत्र घेतले जात आहे. मात्र, अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनसैनिकांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून देण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपुरात मनसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून दिले आहे. अशा प्रकारचे शपथपत्र भरून देणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शपथपत्र भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे यांनीच दिले शपथपत्रासंदर्भात आदेश!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी ते वरोरा येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी शपथपत्रे भरून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाच राज यांनी चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रे भरून देण्याचे आदेश दिले होते, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत. आपल्याही पक्षात फूट पडण्याची भीती या राजकीय पक्षांना वाटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेतही फूट पडू नये यासाठी राज ठाकरे यांनी कंबर कसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे.
दरम्यान, मनसेची ही निष्ठेचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची मोहीम फक्त चंद्रपुरापुरतीच मर्यादित असेल की राज्याच्या इतर जिल्ह्यातही ही मोहीम राबवली जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.