मविआ सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:08 PM2021-12-08T16:08:02+5:302021-12-08T16:13:56+5:30
सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये; पडळकरांचा पुन्हा एल्गार
मुंबई: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वीज तोडणीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधलाय. 'शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटावर सरकारने कुठलीही मदत तर केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. मुख्यमंत्रीही वर्षाच्या बाहेर पडायला तयार नव्हते. अशात, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस वीज कनेक्शन तोडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांवर अस्मानी संकटात कुठलीही मदत केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. मुख्यमंत्रीही वर्षाच्या बाहेर पडायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत आव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीने वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याच वेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाभकास आघाडीने घेतला आहे.
दोन-दोन चार-चार वर्षामागील वीजबील, पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देणे, यात अनेक त्रुटी व अनियमीतता आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यांनीशी वीजबीला संदर्भातील भोंगळ कारभार उघडा पाडला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशाराच पडळकरांनी दिला. तसेच, मी समस्त शेतकरी भावांनो अवाहन करतो की, ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे, आपआपल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे ते सूपूर्द करून पोचपावती घ्यावी.