सूर्यास्तानंतर तसंच दारू प्यायल्यानंतर समुद्रात पोहण्यास गोव्यामध्ये बंदी घालण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 11:43 AM2017-09-09T11:43:42+5:302017-09-09T11:51:05+5:30
मद्य प्यायलेल्या अवस्थेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी घालण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोहताना बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोहण्यास निर्बंध घालण्याचा सरकार विचार करत आहे.
पणजी, दि. 9 - मद्य प्यायलेल्या अवस्थेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी घालण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोहताना बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोहण्यास निर्बंध घालण्याचा सरकार विचार करत आहे.
गोव्याच्या समुद्रात गेल्या पंधरा दिवसांत एकूण सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या महिन्यात सुरू होत असतानाच समुद्रात बुडून मृत्यू पावणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पर्यटन आणि पोलिस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. गुरुवारी अहमदाबादमधले दोन विद्यार्थी कँडोलिम बीचवर बुडाले, त्याआधी एकच दिवस, वेगवेगळ्या बीचवर दोन पर्यटक बुडाले होते.
या घटनांनंतर जलरक्षकांच्या खासगी संस्थेने एक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली होती. विशेष म्हणजे या सगळ्या दुर्दैवी घटना सूर्यास्तानंतर घडल्या होत्या, ज्यावेळी समुद्रावर लाइफ गार्ड नसतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर व मद्यप्राशन करून समुद्रात पोहण्यास उतरणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्याचा विचार होत आहे. सरकारी प्रवक्त्याने या संदर्भात सांगितले की मद्य प्राशन केल्यानंतर किंवा सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास बंदी घालणारा कायदा करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. या खेरीज पर्यटकांशी संबंध येणाऱ्या सगळ्या स्थानिकांनी पर्यटकांना काळोख पडल्यानंतर समुद्रात उतरण्यास मज्जाव करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गोव्यातल्या सगळ्या बीचेसवर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात लाइफगार्ड असतात, मात्र रात्री ते नसतात आणि याच वेळात पर्यटक बुडण्याची शक्यता जास्त असते.
वर्षाला सुमारे 60 लाख पर्यटक गोव्यात येतात
गोव्याला वार्षिक सरासरी 60 लाख पर्यटक भेट देतात. यात बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश असतो आणि समुद्रात बुडून मृत्यू होणारेही बहुतांश देशी पर्यटकच आढळून येत आहेत. अहमदाबाद गुजरात येथील एका शैक्षणिक संस्थेच्या दोघा विद्यार्थी मुलींचा गुरुवारी 7 रोजी उत्तर गोव्यातील कांदोळी समुद्रात बुडून मृत्यू झाला.
तीन दिवसांपूर्वी नैनितालमधील पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. कांदोळी व कळंगुटच्या पट्ट्यातील समुद्रात गेल्या आठवडाभरातच चौघा पर्यटकांना जलसमाधी मिळाली. तत्पूर्वी दोनापावल येथील समुद्रात होडी उलटून दोघे मच्छिमार बुडाले.