संतप्त शिवप्रेमींच्या तीव्र निदर्शनानंतर ‘आज के शिवाजी’ पुस्तक घेतले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:59 AM2020-01-14T01:59:03+5:302020-01-14T06:33:29+5:30
प्रकाश जावडेकर यांची माहिती : पुस्तकाशी भाजपचा संबंध नसल्याचा दावा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून सलग दुसºया दिवशी राज्यभर सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. हा वाढता रोष पाहून लेखक जयभगवान गोयल यांनी ते पुस्तक मागे घेतले आहे, अशी माहिती भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
प्रकाश जावडेकर यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी एक महाराज महान राज्यकर्ते होते. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतले. आमच्यासाठी ते सदैव प्रेरणास्थानी असतील. या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही. लेखकाने याबाबत माफीही मागितली आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडायला हवा.
तत्पूर्वी सोमवारी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्याविरोधात राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटनांनी आंदोलने केली. काही ठिकाणी संबंधित लेखकाचे पुतळे व प्रतिमा जाळण्यात आल्या, तसेच हे पुस्तक तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानाजवळील काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जय भगवान गोयल यांच्या अटकेची मागणी करत, त्यांचा प्रतीकात्मक पुतळाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळला. लेखकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
पुण्यात गोयल यांच्या विरोधात पोलिसांकडे फिर्याद केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडने निदर्शने करून निषेध केला, तर आम आदमी पार्टीने मोदीच हे करत असल्याचा आरोप केला. भाजपने मात्र हे निव्वळ राजकारण सुरू असल्याचे मत व्यक्त केले.
कोल्हापूरमध्ये युवक काँग्रेसने आरएसएस, भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. भाजपच्या पोस्टरवर यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. शिवसेनेतर्फे गोयल यांचा निषेध करण्यात आला. संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चपला मारल्या.
नाशिकमध्ये अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी केली. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस ‘चप्पल मारो आंदोलन’ करण्यात आले. भुसावळ व मुक्ताईनगर येथे मराठा समाज मंडळ व मुस्लीम समाजातर्फे पुस्तकावर बंदी घालण्याचे निवेदन प्रांत व तहसीलदारांना देण्यात आले. चिखलदरा (अमरावती) येथे निषेध नोंदविण्यात आले.
काँग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन
शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपकडून आता शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करून शिवरायांचा अपमान केला आहे, असा आरोप करत, काँग्रेसने मंगळवारी भाजपविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. पुस्तक तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
संपूर्ण देशाचे आराध्य दैवत
जयभगवान गोयल यांच्या पुस्तकातील लिखाण ही भाजपची अजिबात भूमिका नाही, असे भाजपने म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, भाजपच्या दिल्लीतील कार्यालयातच या पुस्तकाचे प्रकाशन कसे झाले, यावर भाजपचे नेते बोलण्यास तयार नाहीत. पुस्तक हे माझे व्यक्तिगत लेखन असून, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. याचा भाजपशी काहीच संबंध नाही. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर पुस्तकातील तो भाग काढण्यास मी तयार आहे, असे गोयल म्हणाले होते.