गोव्यात संघ फुटल्यानंतर स्वयंसेवक अस्वस्थ व संभ्रमित
By admin | Published: September 2, 2016 05:29 PM2016-09-02T17:29:17+5:302016-09-02T17:29:17+5:30
गोव्याच्या खेडय़ापाडय़ांत असलेला संघ स्वयंसेवक सध्या संभ्रमित अवस्थेत असून तो दुखावला गेला आहे. तो अस्वस्थ आहे.
Next
>सदगुरू पाटील
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २ - गोव्यातील इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करा या मागणीवरून झालेल्या वादाची परिणती म्हणून पंचावन्न वर्षानंतर प्रथमच गोव्यात संघ फुटला. संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली नवा संघ स्थापन होऊन कोकण प्रांताशी असलेले नाते तोडले गेले. मात्र प्रश्न सुटलेला नाही. गोव्याच्या खेडय़ापाडय़ांत असलेला संघ स्वयंसेवक सध्या संभ्रमित अवस्थेत असून तो दुखावला गेला आहे. तो अस्वस्थ आहे.
पोर्तुगीजांच्या राजवटीतून 1961 साली गोवा मुक्त झाला व लगेच त्याचवर्षी गोव्यातील पहिली संघ शाखा पणजीत स्थापन झाली. अवघ्याच स्वयंसेवकांनी मिळून शाखा सुरू झाली होती, वेलिंगकर हे त्यावेळी संघाशी जोडले गेले होते. त्यांची संघनिष्ठा ही गेली पन्नास वर्षे संशयापलिकडे राहिली. गोव्यातील संघाचे सगळे स्वयंसेवक अगोदर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आपला मानायचे. काँग्रेसविरुद्ध लढताना संघ स्वयंसेवक म.गो.च्या सिंहाला मतदान करत होते. मात्र पन्नास ते पंचावन्न आता प्रथमच वेलिंगकर यांनी संघाच्या सर्व पदाधिका:यांना व स्वयंसेवकांना घेऊन बंड पुकारले. हे बंड पुकारण्यासाठी कारण ठरला तो गोव्यातील प्राथमिक शिक्षणाचा वाद. गोव्यात काँग्रेसच्या सरकारने 135 इंग्रजी शाळांना अनुदान देणो सुरू केले. हे अनुदान बंद करावे अशी मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या माध्यमातून वेलिंगकर यांनी व एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि विरोधात असताना भाजपने लावून धरली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर भाजपने काँग्रेसचेच धोरण पुढे नेणो पसंत केले. आपण इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करू शकत नाही, अशी भूमिका भाजप सरकारने घेतल्याने वेलिंगकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 95 टक्के स्वयंसेवक व पदाधिकारी चिडले होते. तिथूनच गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपशी संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष एवढय़ा टोकाला पोहचला की, भाजप सरकार म्हणजे लोकांची फसवणूक करणारेच सरकार आहे व मनोहर र्पीकर हे विश्वासघातकी आहे, अशी जोरदार टीका संघचालकपदी असतानाच वेलिंगकर यांनी गोवाभर सभा घेत सुरू केली होती. यामुळे भाजपने गोव्यात संघचालक बदलावा अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रीय संघचालक मोहन भागवत यांच्याकडेही केली होती.
गोवा राज्य हे संघाच्या रचनेच्यादृष्टीने कोकण प्रांताचा भाग आहे. कोकण प्रांताने वेलिंगकर यांना संघचालक पदातून मुक्त करण्याचे ठरविले होते. मात्र कोकण प्रांताच्या पदाधिका:यांना नेमकी संघी मिळत नव्हती. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे व इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करायला हवे हा मुद्दा घेऊन नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा गेल्या आठवडय़ात भारतीय भाषा सुरक्षा मंचने केली. वेलिंगकर हे या मंचाचे निमंत्रक आहेत. कोकण प्रांताने हीच संधी घेतली व तुम्ही संघचालकपदी राहून राजकीय पक्षाचे काम करू शकत नाही, असे वेलिंगकर यांना सांगितले. वेलिंगकर यांनी आपण स्वत: निवडणूक लढवणार नाही पण इंग्रजी शाळांचे सरकारी अनुदान बंद झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे संघाच्या कोकण प्रांताला सांगितले पण कोकण प्रांत पदाधिका:यांनी वेलिंगकर यांना संघचालक पदातून मुक्त केले जात असल्याचे जाहीर केले. याचे तीव्र पडसाद त्याचदिवशी गोव्यातील पंचावन्न वर्षाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उमटले आणि संघाच्या गोव्यातील सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकत्र्यानी आपले सामुहिक राजीनामे जाहीर केले. आम्हाला वेलिंगकर हेच संघचालकपदी हवे आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. यानंतर दुस:याच दिवशी म्हणजे गुरुवारी त्या सगळ्य़ा पदाधिकारी व कार्यकत्र्यानी आपण राजीनामे मागे घेत असल्याचे जाहीर करत गोव्यात नवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाल्याची व त्या संघाच्या संघचालकपदी सुभाष वेलिंगकर यांची आम्ही नियुक्ती केल्याचे घोषित केले. आमची निष्ठा भगव्या ङोंडय़ाशी व हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या विचारधारेशी व तत्त्वप्रणालींशी आहे पण कोकण प्रांताशी आमचा काहीच संबंध नसूून आमचा संघ हा गोव्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असे वेलिंगकर व त्यांच्या सहका:यांनी जाहीर केले. तथापि, नागपुरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रकाराला हरकत घेतली आहे. अशा प्रकारे गोव्यासाठी स्वतंत्र रा. स्व. संघ असू शकत नाही, गोव्यातील मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघचालक पदासह ज्या जागा रिकाम्या झाल्या आहेत, त्या लगेच भरल्या जातील आणि गोव्याचा रा. स्व. संघ हा कायम कोकण प्रांताचा भाग राहील, असे दिल्लीहून संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी जाहीर केले आहे.
गोवा विधानसभा निवडणुका येत्या अवघ्या पाच-सहा महिन्यांत होणार आहेत. गोव्यातील भाजपवर वेलिंगकर यांच्या संघाचा काही परिणाम होईल का या प्रश्नाचे उत्तर अजुनही अभ्यासक शोधत आहेत. सरकारमधील मंत्री व आमदारांना परिणाम होईल असे वाटत नाही. मात्र गोव्यातील संघ स्वयंसेवकांना येत्या निवडणुकीपूर्वी सुधारणा झाल्या नाही तर भाजपमधील जाणकारांचे निवडणुकीविषयीचे काही अंदाज चुकू शकतात अशी चर्चा स्वयंसेवकांमध्ये आहे. वेलिंगकर यांच्या प्रेमापोटी बंडखोरांच्या संघासोबत रहायचे की आपण मूळ नागपुरच्या व कोकण प्रांताच्याच संघाची कास धरायची असा प्रश्न गोवाभरातील अनेक स्वयंसेवकांना पडला आहे. भाजपकडे केंद्रात व गोव्यात सत्ता असल्याने वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील सध्याचा बंडखोरांचा संघ लवकर फुटेल असेही मानले जात आहे. तसे झाल्यास भारतीय भाषा सुरक्षा मंचचे आंदोलनातील हवा निघून जाईल व ती चळवळ निष्फळ ठरेल.