व्हिडीओ- बंदोबस्ताच्या तणावमुक्तीनंतर पोलिसांनी दिला बाप्पाला निरोप
By Admin | Published: September 16, 2016 08:13 PM2016-09-16T20:13:34+5:302016-09-16T20:31:06+5:30
गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणाला लागून पोलीस वसाहत आहे. या वसाहतीत श्री गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती.
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली,दि.16- गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणाला लागून पोलीस वसाहत आहे. या वसाहतीत श्री गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. पोलिसांचे कुटुंब या गणेशोत्सवात मागील दहा दिवस उत्साहाने सहभागी झाले होते. घरातील पोलीस कर्मचारी सार्वजनिक गणेश मंडळांचा दहा दिवस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त सांभाळत असताना प्रचंड तणावात होता. गडचिरोली शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी गुरूवारी गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला.
रात्री एक ते दीड वाजेपर्यंत हे विसर्जन चालले. पोलीस वसाहतीत असलेल्या या गणरायाला आज पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार निरोप दिला. जवळजवळ दुपारनंतर गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात डीजे लावून पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मनमुराद नाचले. त्यानंतर सजविलेल्या ट्रकवर गणरायाला ठेवून गडचिरोली शहराच्या चंद्रपूर मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही पोलीस कर्मचाºयांनी ढोलताशाच्या निनादात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गडचिरोली शहराच्या तलावात पोलिसांच्या या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक व इतर सर्व पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते.