मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची तत्परता; मजुराच्या मुलासाठी २४ तासांत यंत्रणा हलवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:14 IST2025-03-31T12:12:26+5:302025-03-31T12:14:14+5:30
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दैनंदिन खर्च भागवणेही मोठं आव्हान आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची तत्परता; मजुराच्या मुलासाठी २४ तासांत यंत्रणा हलवली
अहिल्यानगर - शहरातील १६ वर्षीय सतीश होडगर हा इयत्ता दहावीत शिकणारा एक हुशार विद्यार्थी, एका दुर्दैवी अपघातात तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय असल्याचं सांगितले.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सतीशच्या कुटुंबासाठी ही शस्त्रक्रिया परवडणारी नव्हती. अशातच सतीश यांना मुख्यमंत्रीवैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून तातडीने १ लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ही रक्कम एकाच दिवसात रूग्णालयाच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याने त्याच्या पालकांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
सतीशचे वडील मारूती होडगर यांचा काही वर्षापूर्वी अपघात झाला आणि त्यात त्यांनी उजवा डोळा कायमचा गमावला. दिव्यांग असल्याने त्यांना जड कामाची नोकरी मिळू शकली नाही म्हणून ते एका लहानशा रसवंतीगृहात रोजंदारीवर काम करतात. जिथे त्यांना फक्त ४०० रूपये रोज मिळतो. सतीशची आईही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मोलमजुरी आणि घरकाम करते. तिला दिवसाला ३०० रूपये मजुरी मिळते. सतीशला २ भावंडे आहेत. मोठी बहीण २० वर्षाची असून लहान भाऊ १२ वर्षाचा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दैनंदिन खर्च भागवणेही मोठं आव्हान आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत अत्यंत मोलाची ठरते. सतीशच्या बाबतीतही या कक्षाने अवघ्या २४ तासांत आर्थिक मदत मंजूर करून तातडीने रक्कम वर्ग केली अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.