अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:09 AM2024-07-31T11:09:20+5:302024-07-31T11:12:25+5:30

राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे.

After the attack Amol Mitkari NCP Sunil Tatkare reply to raj thackeray | अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..."

अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..."

Sunil Tatkare on Amol Mitkari Attack : पुण्यातल्या पुरावरुन सुरु झालेलं राजकारण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडी हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. पुणे दौऱ्यादरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूरपरिस्थितीवरुन पालकमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला होता. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. मिटकरींच्या टीकेनंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराची गाडी फोडली. या सगळ्यात एका तरुण कार्यकर्त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. आतापर्यंत सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते.

मंगळवारी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या वाहनाची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून केली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. या सगळ्यात अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसेच्या एका कार्यकर्त्याचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. तर दोघांना अटकेनंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या सगळ्या वादावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलं आहे. "मी कोणाशी संपर्क करण्याचे कारण नाही. प्रत्येक राजकीय पक्षाने टीका टिपणी करताना भान राखलं पाहिजे. राजकारणामध्ये ज्यावेळी दुसऱ्यावर टीका करतो त्यावेळी आपल्यावर टीका झाली तर ती समजून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. मी अमोल मिटकरींशी बोलण्याचा केला पण त्याच्यांशी संपर्क होऊ शकला नाही," असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: After the attack Amol Mitkari NCP Sunil Tatkare reply to raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.