बीआरएसच्या महाराष्ट्र विस्ताराला धक्का; तेलंगणातील पराभवामुळे बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 10:20 AM2023-12-04T10:20:01+5:302023-12-04T10:20:30+5:30

तेलंगणा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. आपल्याकडील काही जिल्ह्यांच्या सीमा या राज्याला लागून आहेत.

After the defeat in Telangana, BRS suffered a blow in Maharashtra | बीआरएसच्या महाराष्ट्र विस्ताराला धक्का; तेलंगणातील पराभवामुळे बॅकफूटवर

बीआरएसच्या महाराष्ट्र विस्ताराला धक्का; तेलंगणातील पराभवामुळे बॅकफूटवर

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे बारसे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे करून राष्ट्रीय पटलावर जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले ते महाराष्ट्रात. मात्र, आज त्यांच्याच राज्यात त्यांचा दारूण पराभव झाल्याने महाराष्ट्रात आता विस्तार होण्याऐवजी संकोचाची शक्यता अधिक आहे. 

तेलंगणा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. आपल्याकडील काही जिल्ह्यांच्या सीमा या राज्याला लागून आहेत. भाजप, काँग्रेससह काही लहान पक्षांचे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते, प्रमुख कार्यकर्ते यांना आपल्याकडे खेचण्याचे काम राव यांनी महाराष्ट्रात सुरू केले. बीआरएसमुळे कोणाला कुठे फटका बसणार याचे विश्लेषण सुरू झाले. तेलंगणामध्ये घेतलेले लोकाभिमुख निर्णय जाहिरातींच्या माध्यमातून राव यांनी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवले. मोठ्या सभादेखील घेतल्या. आमदार, मंत्र्यांसह पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन ते आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले होते. 

माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य असे बरेच जण राव यांच्या गळाला लागले. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या पक्षाच्या असंतुष्टांना सोबत घेण्याची रणनीतीही या पक्षाने आखली होती. लोकसभा निवडणुकीत हाच फाॅर्म्युला वापरून आव्हान उभे करण्याची तयारी पक्षाने चालविली होती. मात्र, आता तेलंगणामधील पराभवामुळे ते बॅकफूटवर गेले आहेत. आता 
सत्ताहीन झालेल्या बीआरएसला या आघाडीवर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

पराभवाचे कारण
राव यांच्या पक्षात असलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्वत:च्या आमदार, खासदारांना न भेटणे, एककल्ली कारभार करणे यामुळे राव यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली. राव यांनी राबविलेल्या योजना जनहिताच्या होत्या, पण मनमानी करणे त्यांना पराभवाकडे घेऊन गेले असे ते म्हणाले.

तेलंगणामध्ये पराभव झाला म्हणून बीआरएसच्या विस्ताराला मर्यादा येतील असे मला वाटत नाही. के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात आणलेल्या लोकहिताच्या योजना महाराष्ट्रात राबविल्यास जनकल्याण होईल, अशी मोठी भावना लोकांमध्ये आहे. राव नक्कीच जोमाने परत येतील, त्यासाठीचा माार्ग महाराष्ट्रातून जाईल.- शंकरअण्णा धोंडगे, बीआरएस, महाराष्ट्र अध्यक्ष, माजी आमदार.

Web Title: After the defeat in Telangana, BRS suffered a blow in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.