मराठा समाजानंतर धनगरही आक्रमक; उद्या मोठ्या संख्येनं एकत्र या, पडळकरांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 06:09 PM2023-11-20T18:09:35+5:302023-11-20T18:10:15+5:30
आपले आंदोलन ताकदीनं करावे आणि सरकारला दखल घेण्यास भाग पाडावे असं आवाहन पडळकरांनी धनगर समाजातील लोकांना केले आहे.
मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठीही आंदोलनाची चळवळ हाती घेण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. परंतु धनगर समाजाचा एसटीत समावेश होऊ नये यासाठी आदिवासी समाजाकडून सातत्याने विरोध होत आहे. त्यात राज्यात मराठा आरक्षणासोबत आता धनगर आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रातील तमाम धनगर योद्धांना मी २१ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता, धनगर आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी तहसिल, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालये इथं निवेदन द्यायचे आहे. लोकशाही मार्गाने शांततेत हे आंदोलन करायचे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालये इथं निवेदन द्यावे. मी स्वत:उद्या मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात समाजाच्या माध्यामतून हे निवेदन देणार आहे. आपण सरकारला दिलेली ५० दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे उद्या आपले आंदोलन ताकदीनं करावे आणि सरकारला दखल घेण्यास भाग पाडावे असं आवाहन त्यांनी धनगर समाजातील लोकांना केले आहे.
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणारंय.उद्या २१नोव्हेंबरला जवळच्या तहसिलदार,प्रांत,जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण अंमलबजावणीची निवेदनं द्यायचीयेत.सरकारने दिलेली ५० दिवसांची मुदत संपलीये.त्यामुळे आपली ताकद दाखवण्यासाठी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घ्या. pic.twitter.com/EheT1PY5Zl
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 20, 2023
बारामतीत धनगर समाजाचे आमरण उपोषण
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची मागणी तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी धनगर आक्रमक झाले आहेत.रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामती शहरातील सहयोग सोसायटीसमोर भिगवण रस्त्यावर धनगर समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले.शहरातील प्रशासकीय भवन समोर चंद्रकांत वाघमोडे पाटील यांचे आरक्षणासाठी गेले ११ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री आंदोलनाच्या ठिकाणी येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. वाघमोडे यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आजपर्यंत ग्रामीण भागात रास्तारोको,कॅंडल मार्च,बारामती शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.त्यापाठोपाठ रविवारी धनगर समाज बांधवांनी प्रत्येक आमदार खासदाराच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजातील कार्यकर्ते आंदोलनासाठी एकत्रित आले होते.