स्वारगेटच्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, बसस्थानक आणि आगारांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:15 IST2025-02-27T17:14:33+5:302025-02-27T17:15:57+5:30

Swargate Rape Case: स्वारगेट येथील बस स्थानकामध्ये एका तरुणीवर बसमध्येच अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याबरोबरच या धक्कादायक प्रकारामुळे राज्य सरकार आणि परिवहन खात्यालाही खडबडून जाग आली आहे.

After the Swargate incident, Pratap Saranaik orders the government to conduct a thorough security audit of the Jags, bus stands and warehouses | स्वारगेटच्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, बसस्थानक आणि आगारांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश

स्वारगेटच्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, बसस्थानक आणि आगारांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश

मुंबई - स्वारगेट येथील बस स्थानकामध्ये एका तरुणीवर बसमध्येच अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याबरोबरच या धक्कादायक प्रकारामुळे राज्य सरकार आणि परिवहन खात्यालाही खडबडून जाग आली आहे. राज्यातील सर्वच बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच बसस्थानक आणि आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या बस आणि परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांची १५ एप्रिलपर्यंत विल्हेवाट लावण्यात यावी, अशी सूचनाही परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.  

बस प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर  असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याची सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. याबरोबरच बसस्थानक परिसरातील निर्लेखित बसची विल्हेवाट लावण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येवून १५ एप्रिलपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून, या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याची सूचनाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक आढावा बैठक अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या दालनात घेण्यात आली.  बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय (प्रभारी) विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एस टी महामंडळाचे अधिकारी  उपस्थित होते.
       
यावेळी परिवहन मंत्री म्हणाले, राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्हीची एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे.  बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांची गस्त बसस्थानकावर वाढवण्यात यावी, आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे! जेणेकरून २४ तास त्यांच्या निरीक्षणाखाली आगाराचे व्यवस्थापन चालेल. याबरोबरच बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कोणी लुबाडणार  नाही, असेही त्यांनी सांगितले. 

तसेच बसस्थानक अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालक – वाहक यांनी आगारात त्यांनी आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. बसचे दरवाजे बंद करण्याची काळजी घ्यावी व साध्या बसेसमध्ये दरवाजासह खिडक्याही बंद असल्याची खात्री करावी. बस स्थानकांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परीसरात फिरणाऱ्या अनोळखी इसमांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे आदेशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

Web Title: After the Swargate incident, Pratap Saranaik orders the government to conduct a thorough security audit of the Jags, bus stands and warehouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.