मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर फोन बंद केला अन्...; शिंदे गटातील आमदाराचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:01 PM2022-08-10T13:01:03+5:302022-08-10T13:01:34+5:30
मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली असं शहाजी पाटलांनी म्हटलं.
पंढरपूर - शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. पहिल्या टप्प्यात १८ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यानं शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा समोर आली. त्यात बच्चू कडू यांच्यासारख्या आमदारांनी थेट जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली.
शिंदे गटातील सर्वात लोकप्रिय आमदार असलेले शहाजी पाटील हेदेखील मंत्रिमंडळात नाव नसल्याने नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यात शहाजी पाटील यांचा फोन बंद असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले गेले. या परिस्थितीवर भाष्य करताना शहाजी पाटील म्हणाले की, माझा फोन नॉटरिचेबल नव्हता. तो लागला नसेल. काल सकाळपासून गडबडीत होतो. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शपथविधीला गेलो. शपथविधी झाल्यानंतर मी फोन बंद केला आणि गावाकडे निघून आलो. मी नाराज वैगेरे नाही. मी नाराज असण्याचं काही कारण नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली. सर्वव्यापक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मी जेव्हा मुंबईकडे गेलो त्याचवेळी मी बैठकीला चाललोय मंत्रिपदाची अपेक्षा करू नका असं कार्यकर्त्यांना सांगितले होते असं आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.
त्याचसोबत एखाद्या आरोपात पोलिसांनी क्लीनचीट दिल्यानंतरही एखाद्या नेत्यावर आरोप करून त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात का? पोलिसांनी चौकशीनंतर राठोड यांना आरोपातून मुक्त केलेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. अब्दुल सत्तारांची चौकशी होईल त्यानंतर पुढे जोकाही निर्णय असेल मुख्यमंत्री घेतली. शिवसेनेने गळ टाकून ठेवला आहे. परंतु २०-२५ वर्ष कोणी हाती लागणार नाही. आम्ही ५० जण घट्ट आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार आहोत असंही शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना टोला लगावला.
दरम्यान, आमचं बंड नव्हे शिवसेना वाचवण्यासाठी क्रांती आहे. शिंदे यांनी जी भूमिका घेतली त्याला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. जर हा निर्णय घेतला नसता तर आगामी निवडणुकात शिवसेना रसातळाला गेली असती. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाले नाही. त्यामुळे पूर्ण विस्तार झाल्यानंतर काय परिस्थिती असेल त्यावर बोलू असं शहाजी पाटील यांनी सांगितले.