विठ्ठल कोणाला पावणार? पूजेनंतर शिंदे लगबगीने दिल्लीला गेले, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 13:53 IST2023-06-30T13:52:07+5:302023-06-30T13:53:19+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळाल्याचा फायदा शिंदेंनाच होणार आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे १३ खासदार केंद्रात आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकारला वर्ष झाले आहे.

विठ्ठल कोणाला पावणार? पूजेनंतर शिंदे लगबगीने दिल्लीला गेले, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे?
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पुन्हा एकदा मित्रपक्षांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. दूर गेलेल्या मित्रपक्षांना केंद्रात मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. अशातच पंढरपुरात विठ्ठलपूजा झाल्यावर शिंदेंना दिल्लीत बोलविल्याचा फोन आला आणि लगबगीने ते निघालेही. मोदी मंत्रिमंडळ पुनर्रचना करणार आहेत. महाराष्ट्रात बंड करून पुन्हा भाजपासोबत आलेल्या शिंदे सरकारला केंद्रात नेतृत्व मिळणार आहे. शिंदेंनाही त्याची गरज आहे. असे असले तरी मोदी एकाच तीराने अनेक लक्ष्य भेदण्याच्या प्रयत्नात आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळाल्याचा फायदा शिंदेंनाच होणार आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे 12 खासदार केंद्रात आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकारला वर्ष झाले आहे. अशातच गेली वर्षभर शिंदे गटाला केंद्रात नेतृत्व मिळत नव्हते. कालच्या बैठकीत शिंदे गटाला एक किंवा दोन मंत्रिपदे मिळण्याचे संकेत आहेत. यामध्ये खासदार प्रतापराव जाधव आणि भावना गवळींचे नाव चर्चेत आहे.
केंद्रात कोणाला मंत्रिपद मिळणार याचे पत्ते अजून एकनाथ शिंदे यांनी खोललेले नाहीएत. केंद्रात आपले बळ वाढविण्यासाठी शिवसेनेला मंत्रिपद लागणारच आहे. चर्चा अशीही आहे की शिंदेंनी दोन मंत्रिपदे मागितली आहेत. परंतू, केंद्राने एका मंत्रिपदाची गॅरंटी दिली आहे. मोदींच्या राज्यात शिवसेनेला यापूर्वीही दोनदा एकच मंत्रिपद मिळालेले होते. २०१४ मध्ये अनंत गिते आणि २०१९ मध्ये अरविंद सावंत हे मंत्री होते. दोन्ही वेळी शिवसेनेला अवजड उद्योग मंत्रालयच मिळाले होते.
मंत्रालयापेक्षा शिंदे गटाला केंद्रात आपली उपस्थिती दिसण्यासाठी मंत्रिपद हवे आहे. यामुळे शिंदे यांनी एका राज्यमंत्री पदाची मागणी केल्याचे समजते आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाशी दोन हात करायचे आहेत. यासाठी त्यांच्या काळापेक्षा आपल्या काळात शिवसेनेला अधिकचे मिळाले, आपली ताकद किती अधिक हे दाखविण्याची संधी मिळणार आहे. शिंदेंकडे आमदार, खासदार असले तरी शिवसैनिक हे ठाकरेंसोबत असल्याचे, सहानुभुती असल्याचे चित्र आहे, ते बदलण्यासाठी शिंदेंनी ही ताकद उपयोगी पडणार आहे. याबाबतची माहिती एनबीटीने दिली आहे.
मोदींचा प्लॅन काय...
मोदी २०१९ च्या लोकसभेनंतर दुरावलेले आपले मित्रपक्ष जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. शिरोमणी अकाली दल, चिराग पासवान, शिवसेना आदींना आपल्यासोबत घेऊन लोकसभा लढविण्याची तयारी भाजपा करत आहे. यासाठी या पक्षांना केंद्रात अखेरच्या काळात का होईना सत्तेत वाटा देण्याची खेळी मोदी, शहांची आहे.