तीन तासाच्या प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या ठाकरे कुटुंबाची सुटका
By admin | Published: July 12, 2016 12:43 AM2016-07-12T00:43:50+5:302016-07-12T00:43:50+5:30
खामगाव तहसील प्रशासनाच्या आवाहनाला युवकांचा प्रतिसाद दिला.
खामगाव (जि. बुलडाणा): सुजातपूर शेत शिवारातील पुरात अडकलेल्या रामेश्वर ठाकरे यांच्या कुटूंबियांना तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे.
बोर्डी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी परिसरातील नाल्यामध्ये शिरले. दरम्यान सुजापूर शेत शिवारात रामेश्वर ठाकरे त्यांची पत्नी, मुलगा, सुन व नातू असे पाच जण शेतातील झोपडीत असताना ते चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढले गेले. ही बाब श्याम ठाकरे या युवकाच्या लक्षात येताच त्यांनी खामगाव तहसीलदार कुणाल झाल्टे यांना या संदर्भात माहिती दिली.
तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होताना सोशल मिडीयावर पट्टीच्या जलपटुना मदतीची हाक दिली. या आवाहनास खामगाव शहरातील किशोरआप्पा भोसले, संजय खंडेराव यांच्यासह अनेक युवकांनी प्रतिसाद देत सुजातपूर परिसर गाठला. त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या नैसर्गिक आपत्ती निवारणाचे पथकही दाखल झाले. नदीपात्रातील झाडांना दोर्या बांधून युवकांनी प्रवाहात प्रवेश घेतला व ठाकरे कूटूंबियांना लाइफ ज्ॉकेट घालून पुराच्या पाण्यात सुखरुप बाहेर काढण्यात आले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर ठाकरे कुटुंबिय पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर निघाले. त्यांनी व पुरग्रस्त नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर, तहसीलदार कुणाल झाल्टे तसेच जितेंद्र कुयरे, रवि जोशी, नितीन भालेराव, निखील शाह यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.