तीन रुपये दरवाढीनंतरही दूध आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:14 AM2018-07-16T06:14:19+5:302018-07-16T06:14:36+5:30
राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले.
पुणे/कोल्हापूर/सोलापूर : राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. तीन रुपये दरवाढीचा प्रस्ताव देणारे दूध भुकटीच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांनीच भाव पाडला आहे. केंद्राने वेळेवर निर्णय न घेतल्याने भुकटीचे भाव पडले. मात्र कंपन्यांना अजूनही काही फायदे मिळण्याची शक्यता असून दुधाला प्रतिलिटरमागे १२ रुपये वाढ होऊ शकते. मात्र त्यानंतरही उत्पादकांना केवळ तीन रुपये वाढ देतात, असे शेट्टी म्हणाले.
>ग्रामदैवतांना अभिषेक; ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर
रविवारी रात्री १२ वा. ग्रामदैवतांना अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी रविवारी दुपारी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. त्यांच्याकडून शपथपत्रे लिहून घेतली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध रस्त्यावर सोडून दिले.
दूध संकलन आज बंद
पश्चिम महाराष्टÑातील सर्वच संघांनी सोमवारी दूध संकलन बंदचा निर्णय घेतला आहे. ेएक दिवसआधीच संघांनी दूध संकलन बंद ठेवले.
एकूण ५ रुपये दरवाढ
सरकारने दुधाच्या भुकटीला अनुदान देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे.
शहरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने उपाययोजना केली आहे. प्रसंगी पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर आणू.
- महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री
>मुंबईचा पुरवठा वाढविला
दूध संघाने दोन दिवस आधीच दुधाचा मुंबईला होणारा पुरवठा वाढवून किमान दोन दिवस येथे दूधटंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली आहे.
>वरूड (अमरावती) : दूध दरवाढीच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दुधाचा टँकर पेटविण्याचा प्रयत्न करून आंदोलन छेडले. यामुळे दूध उत्पादक व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.