तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत पेंग्विन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2016 03:06 AM2016-07-27T03:06:54+5:302016-07-27T03:06:54+5:30

बर्फाच्या गोळ्यासारखे, एखाद्या गोंडस बाळाप्रमाणे आनंदाने नाचणारे पेंग्विन हे परदेशी पाहुणे अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत मुक्कामासाठी आले आहेत़ दक्षिण कोरिया येथील सेऊल

After three years of waiting, the penguin was filed in the queen garden | तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत पेंग्विन दाखल

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत पेंग्विन दाखल

Next

मुंबई : बर्फाच्या गोळ्यासारखे, एखाद्या गोंडस बाळाप्रमाणे आनंदाने नाचणारे पेंग्विन हे परदेशी पाहुणे अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत मुक्कामासाठी आले आहेत़ दक्षिण कोरिया येथील सेऊल महानगरातील कोएक्स मत्स्यालयातून आठ तासांचा विमान प्रवास करून हम्बोल्ट प्रजातीच्या आठ पेंग्विनचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात मंगळवारी आगमन झाले़ पेंग्विन असलेले हे देशातील पहिलेच प्राणिसंग्रहालय ठरणार आहे़ मात्र त्यांच्या दर्शनासाठी मुंबईकरांना आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे़
भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेचा कायापालट करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभे राहणार आहे़ या प्राणिसंग्रहालयात पेंग्विन हे विशेष आकर्षण ठरणार आहे़ तीन वर्षांपूर्वी असे पेंग्विन आणण्याची घोषणा करण्यात आली़ अखेर अनंत अडचणी पार करीत दक्षिण कोरिया ते राणीबाग असा प्रवास करीत पेंग्विन मुंबईकरांच्या भेटीला आले आहेत़ यामध्ये तीन नर आणि पाच माद्या पेंग्विनचा समावेश आहे़ त्यांचे वय दोन ते तीन वर्षे आहे़
हम्बोल्ट पेंग्विन पक्षी हा ४ ते २५ डिग्री अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात राहू शकतात़ त्यामुळे मुंबईतील वातावरणाशी या पक्ष्यांनी जुळवून घेईपर्यंत सुरुवातीचे तीन महिने पेंग्विनला देखरेखीखाली वेगळ्या कक्षात ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर हम्बोल्ट पेंग्विनला प्रदर्शन कक्षात हलविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

पेंग्विनचे बारसे होणार
सध्या या पेंग्विनला त्यांच्या गळ्यावरील रंगीत पट्ट्यावरून ब्ल्यू रिंग, रेड रिंग अशी नावे देण्यात आली आहेत़ काही दिवसांनंतर त्यांचे नामकरण करण्यात येईल़ त्यांना भारतीय नावच मिळेल़

असा तयार केला बर्फाळ प्रदेश
पेरू आणि चिल्ली या देशांत पेंग्विन आढळतात. या पक्ष्यांसाठी राणीच्या बागेत असलेल्या पिंजऱ्याला शंभर चौरस मीटरची काच असणार आहे़ हा पिंजरा अर्धा पाण्याने भरून त्यामध्ये रेती आणि समुद्र खडकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे़ या कक्षात ठेवण्यासाठी सुमारे सहा ते आठ हजार लीटर पाणी लागणार आहे़ मुख्य कक्षात स्थानांतरित केल्यानंतर तेथे वर्षाला सुमारे ६० ते ८० हजार लीटर्स पाणी पुरवावे लागणार आहे़

पेंग्विन एकाच कुटुंबातील
एकाच कुटुंबातील हे आठ पेंग्विन असून मुंबईत आल्यानंतर पहिले काही तास हे पक्षी थोडे घाबरलेलेच होते़ मात्र काही तासांनी त्यांनी या वातावरणाशीही जुळवून घेतले़ पाण्यात आनंदाने नाचत बागडत त्यांनी सर्वप्रथम कर्मचाऱ्यांची मने जिंकली आहेत़

देखरेखीसाठी खास पथक : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पेंग्विनना सध्या संपूर्णपणे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे़ हे खास पथक त्यांचे खाणे, राहणे त्याचबरोबर या पेंग्विनला मुंबईतील वातावरण मानवत आहे की नाही आदी गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करून त्याची नोंद करणार आहे़ डॉ़ मधुमिता आणि गोवा ट्रेड संस्थेचे डॉ़ रत्नकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकात चार ते पाच जणांचा समावेश आहे़

तीन महिन्यांची प्रतीक्षा
आॅस्ट्रेलियातील आॅशियानीस या कंपनीला पाच वर्षांसाठी पेंग्विनच्या देखरेखीचे कंत्राट देण्यात आले आहे़ यासाठी पालिका २० कोटी रुपये खर्च करणार आहे़ या पेंग्विनच्या रक्ताची व विष्ठेची चाचणीही करण्यात येईल़ तीन महिने असे परीक्षण केल्यानंतरच या पेंग्विनचे दर्शन घेता येणार आहे़

बांगडे व मोरशीचा पाहुणचार
या खास परदेशी पाहुण्यासाठी बांगडा आणि मोरशी माशाचा बेत आखण्यात आला आहे़ हाच या पक्ष्यांचा आहार असून दररोज त्यांना अर्धा ते एक किलो मासे खाद्य म्हणून पुरविण्यात येतील़

पेंग्विनच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था
प्राणिसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळमजल्यावर सुमारे १७०० चौरस फूट क्षेत्रफळाचा संपूर्णपणे वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष तयार करण्यात आला आहे़ त्याचे तापमान १६ ते १८ डिग्री अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात आले आहे़ या पेंग्विनच्या जीवशास्त्रीय गरजा ध्यानात ठेवून हे पक्षीगृह तयार करण्यात आले आहे़
एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़
सद्य:स्थितीत १२ ते १५ सें़मी़ उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सें़मी़ इतकी होईल़
त्या वेळेस त्यांचे वजन चार ते सहा किलो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़

Web Title: After three years of waiting, the penguin was filed in the queen garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.