अथक प्रयत्नांनंतर धोम धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:30 PM2018-01-28T12:30:49+5:302018-01-28T12:33:39+5:30
मुक्कामाचे सर्व साहित्य टेंटमध्ये ठेवल्यानंतर हे चौघेही सायंकाळी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना सुमजित हा गाळात रुतून बुडत असल्याचे अवनिसला दिसले. अविनस हा सुमजितला वाचवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, तोही गाळात रुतू लागला. अशा अवस्थेतही तो सुमजितला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अवनिसला सुमजितने घट्ट मिठी मारली.
वाई : वाई तालुक्यातील धोम धरणात बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह रविवारी सकाळी दहा वाजता सापडले.
सुमजित शहा (वय २५, रा. कोलकाता), अवनिश श्रीवास्तव (२७, रा. गाजियाबाद, दिल्ली) अशी मृत युवकांची नावे आहेत.
मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चमध्ये संशोधन कार्यात सक्रिय असलेले सुमजित शहा, अवनिस श्रीवास्तव, समीर त्रिदिवेसकुमार मिश्रा (३१ रा. उत्तर प्रदेश ), श्रीकांत सचितानंद मूर्ती ( ३० रा. आंध्रप्रदेश ) हे चौघे वाईच्या धोम धरण परिसरात शनिवारी फिरण्यासाठी आले होते. त्यांना हा परिसर आवडल्याने त्यांनी धोम धरणाच्या बाजूला असलेल्या आकोशी आणि कोंडवली या गावांच्या मध्यभागी टेंट लावले. त्या ठिकाणीच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुक्कामाचे सर्व साहित्य टेंटमध्ये ठेवल्यानंतर हे चौघेही सायंकाळी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना सुमजित हा गाळात रुतून बुडत असल्याचे अवनिसला दिसले. अविनस हा सुमजितला वाचवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, तोही गाळात रुतू लागला. अशा अवस्थेतही तो सुमजितला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अवनिसला सुमजितने घट्ट मिठी मारली. त्यामुळे दोघेही धरणाच्या पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी शोध कार्य सुरू केले. परंतु अंधार अन् कडक थंडीमुळे ही मोहीम रात्री अकरा वाजता थांबविण्यात आली. रविवारी पहाटे सहा वाजता ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमजित शहा आणि अवनिश श्रीवास्तव या दोघांचेही मृतदेह शोधण्यात ट्रेकर्सच्या जवानांना यश आले.