विमान, रेल्वेनंतर रवींद्र गायकवाड आता रस्त्यावर

By Admin | Published: March 29, 2017 02:34 PM2017-03-29T14:34:23+5:302017-03-29T14:44:20+5:30

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी संसद अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी रस्त्याने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे

After the train, Ravindra Gaikwad is now on the road | विमान, रेल्वेनंतर रवींद्र गायकवाड आता रस्त्यावर

विमान, रेल्वेनंतर रवींद्र गायकवाड आता रस्त्यावर

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 29 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर चर्चेत गेलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी संसद अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी रस्त्याने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण केल्यामुळे त्यांना एअर इंडियासहित इतर एअर कंपन्यांनी काळ्या यादीत टाकलं असून त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली आहे. 
 
रवींद्र गायकवाड आज कारने दिल्लीमध्ये पोहोचणार असून लोकसभेत मात्र हजेरी लावणार नाहीत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसंच गुरुवारीदेखील लोकसभेत हजर राहायचं की नाही याबाबत पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असंही सुत्रांकडून समजलं आहे. 
 
रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या हैदराबाद ते दिल्ली एआय-551 विमानाचं तिकीट बूक केलं होतं, मात्र ते रद्द करण्यात आलं. यानंतर गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एआय-806 या बुधवारी सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या विमानाचे तिकीट बूक केले होते. मात्र, कंपनीने ते तिकीटदेखील रद्द केले. 
 
विमान प्रवास शक्य नसल्याने रवींद्र गायकवाड मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या नावे राजधानीमध्ये A-3 कोचमध्ये जागाही आरक्षित असल्याचं दाखवलं होतं. मुंबई सेंट्र्लहून ही एक्स्प्रेस निघणार होती. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र गायकवाड यांनी कारने प्रवास सुरु केला आहे. कोणत्याही क्षणी ते दिल्ली पोहचू शकतात.
 
एअर इंडियासह सात विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. खा. गायकवाड यांना पुन्हा विमानाने प्रवास करू देण्याची मागणी करणारा विशेषाधिकार प्रस्ताव शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी लोकसभाध्यक्षांकडे दिला. मात्र सरकारने ‘कोणाचेही गैरवर्तन हे विशेषाधिकाराखाली येत नाही’ अशी कठोर भूमिका घेतली आहे.
 
खासदारावर बंदी घातल्यामुळे सभागृहाच्या हक्कांचा भंग होतो त्यामुळे हा प्रश्न विशेषाधिकार समितीकडे पाठवावा, अशी विनंती शिवसेनेच्या सदस्यांनी मंगळवारी लोकसभाध्यक्षांकडे केली. मात्र दोन पानांच्या विशेषाधिकार प्रस्तावावर सरकार आणि शिवसेनेचे नेते यांच्यात तोडगा निघेल, म्हणून अध्यक्षांनी तो प्रलंबित ठेवला आहे. गायकवाड यांच्या वर्तनाने सगळ्या राजकीय वर्गाला खाली मान घालावी लागली असून कॅमेऱ्यांसमोर त्यांनी जो संताप व्यक्त केला त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा, असे भाजप नेतृत्वाने कळवले आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले की, विशेषाधिकाराचाभंग कोणाच्याही गैरवर्तनाने होत नाही. नक्वी यांनी सेनेच्या खासदाराचा उल्लेख केला नाही. परंतु सरकारला या प्रकरणात नेमके काय वाटते हे स्पष्ट झाले आहे.
 
गायकवाड यांना विमान प्रवासाला परवानगी मिळावी, असे आवाहन शिवसेनेच्या प्रस्तावात आहे. परंतु सरकारच्या नेत्यांकडून शिवसेनेला अनौपचारिकरित्या असे सांगण्यात आले की खासदाराने खेद व्यक्त करावा किंवा त्यांना आणखी काही वेळ वाट बघावी. दिल्ली पोलिसांच्या विशेष चौकशी तुकडीकडून येणाऱ्या अहवालाची सरकारला प्रतीक्षा आहे. या तुकडीने १५ साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही या प्रश्नावर निर्णय घेण्यास दिल्ली पोलिसांकडून या हंगामी अहवालाची माहिती दिली जाईल
 

 

Web Title: After the train, Ravindra Gaikwad is now on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.