उपचारानंतर ‘साडेसाती’ रुग्णालयातच! रुग्णांच्या चपलांचा खच, ‘स्वाराती’ला अंधश्रद्धेचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 04:44 AM2017-09-13T04:44:51+5:302017-09-13T04:44:51+5:30
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (स्वाराती) अंधश्रद्धेने घेरले आहे. या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक रूग्ण तंदुरुस्त होताच आपले पायताण ‘साडेसाती’ समजून रूग्णालयातच सोडून जाऊ लागले आहेत.
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (जि. बीड) : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (स्वाराती) अंधश्रद्धेने घेरले आहे. या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक रूग्ण तंदुरुस्त होताच आपले पायताण ‘साडेसाती’ समजून रूग्णालयातच सोडून जाऊ लागले आहेत. रोजच पादत्रानांचा मोठा खच पडू लागल्याने रूग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मराठवाड्यातील रूग्णांसाठी ‘स्वाराती’आधार केंद्र्र आहे. ग्रामीण भागातून येणाºया रूग्णांची संख्या येथे मोठी आहे. दररोज किमान एक हजारावर रूग्ण उपचारासाठी येतात. एवढ्याच रूग्णांना दररोज रूग्णालयातून सुटी दिली जाते. उपचार झाल्यानंतर परतताना चपला रूग्णालयातच सोडुन जाणाºया रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. ‘रूग्णालयात आलो म्हणजे आपल्या मागे साडेसाती होती. ती पुन्हा नको’, या अंधश्रद्धेतून हा प्रकार वाढाल्याचे माहिती समोर आली आहे. हा प्रकार रोखण्यासाठी सुरक्षारक्षक व कर्मचारी प्र्रयत्न करीत असले तरी त्याला रुग्णांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णालय प्रशासन हैराण झाले आहे.
रोज ३०० रुग्ण होतात दाखल
बाह्य रूग्ण तपासणीसाठी जवळपास ७०० रूग्ण दररोज येतात. रोज दाखल होऊन उपचार घेणाºया रूग्णांची संख्या ३०० च्या जवळपास आहे. एवढ्याच रूग्णांना रोज सुट्टी दिली जाते. त्यामुळे पादत्रानांचा मोठा खच पडत आहे.
‘अंनिस’ करणार जनजागृती
जग सध्या झपाट्याने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान गतिमान होत असताना, अंधश्रद्धेपोटी असे कृत्य घडणे हे दुर्देवी आहे. अशा अनिष्ट प्रथा मोडित काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनजागृतीचे कार्य करील.
- प्रा. डॉ. डी. एच. थोरात,
अंनिसचे जेष्ठ पदाधिकारी
हा नवीन पायंडा रूग्णालयात पडल्याने आम्हीही हैराण झालो आहोत. सुरक्षा रक्षकांसह इतर कर्मचाºयांना असे कृत्य करणाºयांना मज्जाव करण्यास सांगितले आहे.
- डॉ.दिनकर केकान, उप अधीक्षक, स्वाराती रूग्णालय, अंबाजोगाई