दोन महिन्यांनंतरही ‘विधी’चा निकाल नाही
By admin | Published: June 29, 2016 12:51 AM2016-06-29T00:51:08+5:302016-06-29T00:51:08+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला विधी अभ्यासक्रमाचे निकाल दोन महिन्यांनंतरही जाहीर करता आलेले नाहीत.
पुणे : परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे अपेक्षित असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला विधी अभ्यासक्रमाचे निकाल दोन महिन्यांनंतरही जाहीर करता आलेले नाहीत. परीक्षा विभाग व ‘विधी’च्या प्राध्यापकांमध्ये काही कारणांवरून बेबनाव निर्माण झाल्याने निकालाला विलंब होत असल्याचे समजते.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आतापर्यंत बहुतेक अभ्यासक्रमांचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर केले आहेत. दर वर्षी विलंब होणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यातही विभागाने यंदा आघाडी घेतली. तसेच हे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याबाबत विद्यार्थ्यांकडून फारशा तक्रारीही आल्या नाहीत. एकीकडे इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सुखद अनुभव येत असताना विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मात्र निकालाच्या प्रतीक्षेने व्याकुळ झाले आहेत. विद्यापीठाकडून विधीच्या तीन वर्षे व पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांची परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात आली. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात बहुतेक सर्व विषयांची परीक्षा संपली होती. त्यानंतर ४५ दिवसांत म्हणजे साधारणपणे मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाचे तिन्ही वर्षांचे, तर पाच वर्षे कालावधीच्या तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वर्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याबाबत परीक्षा विभागात चौकशीसाठी गेल्यानंतर ‘तुमच्या शिक्षकांनाच लवकर पेपर तपासायला सांगा,’ अशी उत्तरे मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. प्राध्यापक व परीक्षा विभागात काही वाद असल्याने विलंब होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
येत्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आॅक्टोबरच्या अखेरीस पहिले सत्र संपणार आहे. अद्याप निकाल न लागल्याने पुढील वर्षाचे वर्ग सुरू होण्यासाठी आॅगस्ट महिना उजाडेल. त्यामुळे अध्यापनासाठी केवळ दोन ते अडीच महिन्यांचा वेळ मिळेल. या कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागेल.
तसेच, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘एलएलएम’साठी इतर ठिकाणी प्रवेश परीक्षा दिल्या आहेत. निकाल लागण्यापूर्वी ही प्रवेशप्रक्रिया संंपून गेल्यास या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे विधीचे निकाल तातडीने लावावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केली आहे.
>निकाल आज जाहीर करू
निकालाला विलंब होत असल्याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, बुधवारी विधीचे सर्व निकाल जाहीर केले जातील, असे सांगितले. तसेच, विधीच्या फॅकल्टीशी संबंधित काही मुद्दे असल्यामुळे निकालाला विलंब झाल्याचेही डॉ. चव्हाण यांनी मान्य केले.