अखेर दोन वर्षांनी मायलेकीची भेट, कफ परेड पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:49 AM2018-03-11T04:49:33+5:302018-03-11T04:49:33+5:30
उत्तर प्रदेशमधील तरुणी दोन वर्षांपूर्वी घरातून गायब झाली होती. मानसिक रुग्ण असलेली ही तरुणी मुंबईत भटकत होती. भिकारी समजून एका महिलेने तिला कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी तिची विचारपूस करत महिला दिनीच तिची आईसोबत भेट घडवून आणली.
मुंबई - उत्तर प्रदेशमधील तरुणी दोन वर्षांपूर्वी घरातून गायब झाली होती. मानसिक रुग्ण असलेली ही तरुणी मुंबईत भटकत होती. भिकारी समजून एका महिलेने तिला कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी तिची विचारपूस करत महिला दिनीच तिची आईसोबत भेट घडवून आणली.
मूळची उत्तर प्रदेशातील कैसरगुंज गावात राहणारी भोईरा (२५) मानसिक रुग्ण आहे. त्यामुळे आईवडील सतत तिच्यासोबत असायचे. दोन वर्षांपूर्वी ती गायब झाली. बराच शोध घेऊनही ती सापडली नाही.
७ मार्च, २०१८ रोजी मुंबईत एका महिलेला ही तरुणी हात धरून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. या महिलेने पोलिसांना असे भिकारी धोकादायक ठरू शकतात, हिच्यावर कारवाई करा, असे सांगितले. पोलीस तिला घेऊन पोलीस ठाण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी तिला आईच्या मायेने जवळ घेतले आणि विचारपूस केली. तिला काहीही आठवत नव्हते. अनेक तासांनी तिने भोईरा म्हणून तिचे नाव सांगितले. कैसरगंज हे गावाचे नाव सांगितले. एवढ्याशा माहितीवरून जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध सुरू केला.
आई-वडिलांनी गाठली मुंबई
मुलगी जिवंत आहे हे समजताच आईवडिलांनी मुंबई गाठली. महिला दिनीच भोईराची आईसोबत भेट झाली. दोघींनाही आनंदाश्रू अनावर झाले. तरुणीला सुखरूप कुटुंबाकडे सोपविल्याची माहिती कफपरेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी दिली.