एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी; त्रिशुल, उगवता सूर्य चिन्हाची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:40 PM2022-10-10T12:40:30+5:302022-10-10T12:41:34+5:30
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी करत निवडणूक आयोगाकडे पसंतीची ३ चिन्हे पाठवली आहेत. त्यात त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंनीही त्रिशुल, उगवता सूर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळे ठाकरे गटाने मागितलेल्या चिन्हांवरच शिंदे गटाने दावा करत निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर आयोगाने शिंदे-ठाकरे गटाला पसंतीची ३ चिन्हे, नावे आयोगाला कळवावं यासाठी मुदत दिली होती. रविवारी शिंदे गटाच्या बैठकीत पक्षाच्या नावाची आणि चिन्हाबाबत चर्चा करण्यात आली. त्याआधीच उद्धव ठाकरे गटाकडून त्रिशुल, उगवता सूर्य आणि मशाल या ३ चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली.
शिंदे गटाच्या बैठकीत सुरुवातीला तलवार, गदा आणि तुतारी या चिन्हावर चर्चा झाली. तुतारी चिन्हाला शिंदे गटाकडून प्राधान्य देण्यात आले. परंतु निवडणूक आयोगाकडे चिन्हाची मागणी करताना शिंदे गटाने त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह मागण्यात आले आहे. त्यामुळे आता शिंदे-ठाकरे गटाकडून उगवता सूर्य, त्रिशुल या समान चिन्हाची मागणी झाल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ही दोन्ही नाकारण्याची शक्यता आहे.
‘मातोश्री’वर खलबते
रविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात नवे चिन्ह आणि नावाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार आम्ही प्राधान्यक्रमानुसार तीन चिन्हे आणि तीन नावांचा पर्याय सादर केला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम्हाला निवडणूक आयोगाकडून त्यापैकी एक चिन्ह आणि एक नाव मिळेल. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर ‘आमचं चिन्हं ठरलं’ अशा घोषणा मातोश्रीबाहेर जमलेल्या ठाकरे समर्थकांनी दिल्या.
निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहेत चिन्हे
निवडणूक आयोगाने शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही, असे सांगितले आहे. दोन्ही गटांना आज संध्याकाळपर्यंत चिन्हांचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार वाटप केले जाईल. मात्र सध्या निवडणूक आयोगाकडे १९७ चिन्हे उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग शिंदे-ठाकरे गटाला कोणतं चिन्ह देतं हे पाहणे गरजेचे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"