एकनाथ शिंदे गटाचंही ठरलं! 'या' ३ निवडणूक चिन्हाला पसंती, दुपारपर्यंत अंतिम ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 08:23 AM2022-10-10T08:23:22+5:302022-10-10T08:23:50+5:30
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत चिन्ह, नावाबाबत चर्चा झाली
मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आज दुपारपर्यंत आयोगाने शिंदे-ठाकरे दोन्ही गटाला नाव आणि चिन्ह यासाठी ३ पसंतीचे पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यानुसार ठाकरे गटाने त्यांची ३ नावे आणि चिन्ह जाहीर केली आहेत. आता एकनाथ शिंदे गटाकडूनही नाव, चिन्ह ठरल्याचं समोर आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत चिन्ह, नावाबाबत चर्चा झाली. माहितीनुसार, तुतारी, गदा आणि तलवार यापैकी एक चिन्ह मिळावं अशी शिंदे गटाची अपेक्षा आहे. शिंदे गटाकडून अधिकृत पत्रक काढत याबाबत माहिती जाहीर करण्यात येईल. त्याचसोबत शिंदे गटाकडून पक्षाच्या नावात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे नाव लावण्याचा मानस असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ज्या तुतारीनं रणशिंग फुंकलं जातं ते चिन्ह मिळावं अशी शिंदे गटाची इच्छा आहे. शिंदे गटाच्या बैठकीत आमदार, खासदार उपस्थित होते. त्यामुळे येत्या अंधेरी पूर्व विधानसभेत शिंदे गटाकडून तुतारी चिन्हासह उमेदवार उतरवण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. तलवार, गदा याबाबत दुपारी १ वाजेपर्यंत भूमिका जाहीर होईल. निवडणूक आयोगाने दुपारपर्यंत शिंदे-ठाकरे गटाला मुदत दिली आहे. त्यानंतर तातडीने नाव आणि चिन्हाबाबत आयोगाकडून निर्णय घेण्यात येईल.
‘मातोश्री’वर खलबते
रविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात नवे चिन्ह आणि नावाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार आम्ही प्राधान्यक्रमानुसार तीन चिन्हे आणि तीन नावांचा पर्याय सादर केला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम्हाला निवडणूक आयोगाकडून त्यापैकी एक चिन्ह आणि एक नाव मिळेल. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर ‘आमचं चिन्हं ठरलं’ अशा घोषणा मातोश्रीबाहेर जमलेल्या ठाकरे समर्थकांनी दिल्या.
स्वतः शिवसेनाप्रमुख व्हायला निघालेत
शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणतात की, "शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते, त्यांनी ते मिळवले. इतके दिवस आम्ही सहन केले, पण आता अती होत आहे. शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, इथपर्यंत ठीक होते. पण, आता शिवसेना प्रमुख पद घेण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"