वेदांतानंतर कोकणातील रिफायनरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार? प्रकल्प रखडल्याने आरआरपीसीएएलने दिलं अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 09:40 AM2022-09-15T09:40:42+5:302022-09-15T09:41:11+5:30
Maharashtra Government:
मुंबई - सुमारे एक लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख रोजगार निर्मिती क्षमता असलेला वेदांता फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकारण पेटले आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्य सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, वेदांतापाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला कोकणातील रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचे संकेत मिळल आहे. या प्रकल्पाशी संबंधित कंपनीने सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू केली आहे.
कोकणातील नाणार येथे सुरुवातीला प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या प्रकल्पाची जागा बदलण्यासाठी चाचपणी सुरू झाली होती. दरम्यान, या प्रकल्पाला सुरुवात होण्यास विलंब होत असल्याने या प्रकल्पाशी संबंधित आरआरपीसीएएल कंपनीने प्रकल्पाबाबत सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत राज्य सरकारला महिनाभरात निर्णय घ्यावा लागणार आहे.
आरआरीपीसीएएलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला आहे. विरोध आणि सरकारची भूमिका पाहता कंपनी शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू आहे. कंपनी राज्यात प्रकल्पाचा मार्ग मोकळा न झाल्यास सदर प्रकल्प राज्याबाहेर नेण्याच्या विचारात आहे. कंपनी राज्य सरकारला तसं शेवटचं अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता वेदांतापाठोपाठ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.