कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:29 AM2024-06-25T10:29:55+5:302024-06-25T10:39:21+5:30

Kangana Ranaut : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतने सोमवारी महाराष्ट्र सदनाला भेट दिल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

After visiting Maharashtra Sadan MP Kangana Ranaut directly demanded the Chief Minister suite | कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण

कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण

Kangana Ranaut Maharashtra Sadan Visit : लोकसभा  अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री कंगना रणौतने खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधीनंतर नवनियुक्त खासदार व अभिनेत्री कंगना रणौतने दिल्लीतीलमहाराष्ट्र सदनाला भेट दिली. मात्र आता कंगनाची ही भेट वादात सापडली आहे. यावेळी कंगनाने थेट महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूट (प्रशस्त खोली) मागितला. रूम छोट्या असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांची रूम मिळावी, अशी मागणी कंगनाने केली होती. यासाठी कंगनाने महाराष्ट्रातील बड्या नेत्याला फोन केल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन कंगनावर निशाणा साधला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे सर्व खासदार हे सध्या दिल्लीत आहेत. सध्या या खासदारांच्या राहण्याची सोय विविध राज्यांच्या सदन व भवनांमध्ये करण्यात आली आहे. अशातच खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना रणौत महाराष्ट्र सदनात दाखल झाली होती. यावेळी कंगनाने तिथे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याच सुटची मागणी केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यासाठी कंगनाने महाराष्ट्रातील बड्या नेत्याला फोनाफोनी केल्याचेही म्हटलं जात आहे. कंगनाच्या या मागणीनंतर राजशिष्टाचाराचे पालन करावे लागते व हा कक्ष इतरांना देता येत नाही असे स्पष्टीकरण तिला देण्यात आलं आहे. दुसरीकडे कंगना रणौत यांनी मुख्यमंत्री कक्षाची निवासासाठी कोणतीही मागणी केलेली नव्हती. सदनामध्ये येऊन यांनी खोल्यांची पाहणी केली. त्यांना पसंत असेल तर त्या सदनात राहू शकतात, असे सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार (राजशिष्टाचार व सुरक्षा) यांनी स्पष्ट केले आहे.

या सगळ्या प्रकारावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला. "बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचलभवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी," असे ट्वीट संजय राऊत यांनी केले.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौत ही भाजपच्या तिकीटावर हिमाचलच प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. राजकारणापूर्वी अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिली होती. मात्र आता राजकारणात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री चित्रपट जगताला अलविदा म्हणू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: After visiting Maharashtra Sadan MP Kangana Ranaut directly demanded the Chief Minister suite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.