लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचा मृतदेह घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 06:08 AM2018-01-30T06:08:18+5:302018-01-30T06:08:43+5:30
सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/धुळे : सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून, सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे उभारण्यात येणाºया सौरऊर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारे विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील (वय ८०) यांनी, २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मा पाटील यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, वडिलांना योग्य न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र्र पाटील यांनी घेतली होती. हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच, घाईघाईत पत्रकार परिषद घेत, या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसे लेखी आश्वासन पाटील कुटुंबीयांना देण्यात आले, तर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात जाऊन नरेंद्र पाटील यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या घडामोडीनंतर नातेवाईक धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन धुळ्याकडे रवाना झाले.
हत्येचा गुन्हा दाखल करा
हे सरकार गेंड्यांच्या कातडीचे असून, शेतकºयांना न्याय देऊ शकत नाही. या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकाºयांना तातडीने निलंबित केले पाहिजे.
- धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते, विधान परिषद
धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून, या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष