याकूबनंतर आता सहा जणांचा खटला अंतिम टप्प्यात
By admin | Published: August 1, 2015 04:45 AM2015-08-01T04:45:08+5:302015-08-01T04:45:08+5:30
याकूब मेमनला फाशी झाल्यानंतर आता १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतल्या कोणत्या आरोपीला यापुढे फाशी होणार? याकडे स्फोटग्रस्त कुटुंबांसह अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे.
- अमर मोहिते, जयेश शिरसाट, मुंबई
याकूब मेमनला फाशी झाल्यानंतर आता १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतल्या कोणत्या आरोपीला यापुढे फाशी होणार? याकडे स्फोटग्रस्त कुटुंबांसह अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. सध्या मुस्तफा डोसा ऊर्फ मुस्तफा मजनू, अबू सालेम, ताहिर मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्यासह एकूण सात जणांविरोधात टाडा न्यायालयात खटला सुरू असून तो अंतिम टप्प्यात आहे.
शिवाय रियाझ सिद्दिकी, अब्दुल कय्युम करीम शेख, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खानविरोधातही टाडा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यापैकी सर्वांवरच बॉम्बस्फोटांचा कट रचणे, कटानुसार गुन्हेगारी कृत्य करणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. मात्र त्यातही डोसा, सालेम आणि ताहिर टकल्याची भूमिका आणि सहभाग जास्त असल्याचे सीबीआय सूत्रांकडून समजते. यापैकी सालेम, करिमुल्ला आणि फिरोज यांनी कबुलीजबाब दिला आहे.
सीबीआयकडून ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार सालेमचे पोर्तुगालहून प्रत्यार्पण करण्यात आले होते. प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतातील कोणत्याही गुन्ह्यात देहदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही. त्यामुळे सालेमची मान फासातून निसटली होती. मात्र उर्वरित सहा आरोपींमधील डोसा, ताहिरचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना फाशी होऊ शकते, असे समजते. त्यामुळे याकूबनंतर या आरोपींपैकी कुणाचा नंबर लागतो, याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. सीबीआयने सातही आरोपींविरोधात पुरवणी आरोपत्र दखल केले आहे. तूर्तास टाडा न्यायालय फौजदारी दंड संहितेतील (सीआरपीसी) कलम ३१३ नुसार या सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत. म्हणजेच सीबीआयने ठेवलेल्या आरोपांवर न्यायालय आरोपींना प्रश्न विचारते व त्या प्रश्नांवरील आरोपीने दिलेले उत्तर नोंदवून घेते. ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली असून त्यानंतर बचाव पक्षाला त्यांच्या बाजूच्या साक्षीदारांची (डिफेन्स व्हिटनेस) साक्ष नोंदवण्याची मुभा दिली जाईल.
बचाव पक्षाच्या साक्षीदारांचा पुरावा नोंदवून झाल्यानंतर सरकारी वकील आणि आरोपींचे वकील युक्तिवाद करतील. तो पूर्ण झाल्यावर न्यायालय आरोपी दोषी आहे की नाही, हे जाहीर करेल. आरोपींना काय शिक्षा व्हावी, यावर दोन्ही बाजूचे वकील युक्तिवाद करतील. तो पूर्ण झाल्यावर न्यायालय आरोपींना शिक्षा ठोठावेल.