अफजल, निजाम, नालायक आणि लायकी!
By admin | Published: June 12, 2016 06:28 AM2016-06-12T06:28:49+5:302016-06-12T06:28:49+5:30
लोकसभा निवडणुका एकत्र लढविल्यानंतर शिवसेनेला अचानक भाजपात अफलज खान दिसला. त्याचे जे काय पडसाद उमटायचे ते विधानसभेत उमटले आणि नंतर सत्तेच्या मोहापायी तीच
- अतुल कुलकर्णी, मुंबई
लोकसभा निवडणुका एकत्र लढविल्यानंतर शिवसेनेला अचानक भाजपात अफलज खान दिसला. त्याचे जे काय पडसाद उमटायचे ते विधानसभेत उमटले आणि नंतर सत्तेच्या मोहापायी तीच शिवसेना अफजल खानाच्या बगलेत शिरली. काही काळ सत्तारूपी संसाराचे गाडे चालले न चालले, तो पुन्हा त्याच शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांना दिल्लीतले सरकार निजामाच्या बापासारखे वाटू लागले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राज्य सरकार नालायक वाटायला लागले. मात्र राज्यातील सरकारसोबत बसण्याची उद्धवची लायकी नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आता सेना-भाजपात लावून दिली आहे.
कोणत्याही स्थितीत सेना-भाजपात जोरदार झोंबाझोंबी राष्ट्रवादीला हवी आहे. राज्यातले सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीने दोघांमध्ये भांडणे लावण्याची एकही संधी सोडली नाही. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकदा शरद पवार यांनी तेच केले. शिवसेना नेत्यांची लायकी काढण्यापर्यंतची भाषा पवारांनी वापरली. सत्तेत सहभागी होण्याचे गुळ-खोबरे असलेले आमंत्रणाचे ताट शिवसेनेकडे भाजपाच्या नेत्याने पाठवले नव्हते. मात्र आपण सत्तेत गेलो नाही तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा कारभार चालेल आणि त्यात आपला पक्ष फुटेल या धास्तीने शिवसेना सत्तेत सहभागी झाली. नंतर दोघांनीही अत्यंत हुशारीने विरोधकांचीही जागा स्वत:कडे खेचून घेतली. आपल्या भांडाभांडीच्या खेळात नवी मुंबई, कल्याण डोंबीवली महापालिकेच्या जहागिऱ्या आपसुकच मिळाल्या, हे लक्षात येताच पुन्हा तोच खेळ मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपा शिवसेनेने चालवला आहे.
ही खेळी लक्षात येण्याइतके शरद पवार चाणाक्ष आहेत. त्यांनी म्हणूनच अस्तनीतले खास ‘संजयास्त्र’ बाहेर काढले. पवार आणि खा. संजय राऊत यांचे मधूर संबंध राज्यात सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे खा. राऊत यांनी नेमका बाण सोडला. औरंगाबादमध्ये संजय राऊत यांनी आमचा लढा निजामाच्या बापाशी असल्याचे सांगत भाजपवर हल्ला चढवला. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर बुडबुडे फुटायला लागले आहेत. महाराष्ट्रात बुडबुडे टिकत नाही. फक्त लाट टिकते आणि लाट शिवसेनेची आहे, असेही ते म्हणाले. याआधी मोदी सरकारला अफझलखानाची उपमा देण्याची शिक्षा किती भोगावी लागली होती, हे शिवसेना सत्तेत जाऊन विसरली असली तरी सत्तेबाहेर असलेल्या शरद पवार यांना त्याचा विसर पडलेला नाही. त्यांनी पुन्हा एकदा त्याच निजामकालीन इतिहासाची संजयदृष्टी दाखवून दिली. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि खा. राऊतांच्या विधानावर भाजपाने ‘‘कुठे सूर्य, कुठे काजवा, त्या उद्धवला त्याची जागा समजवा’’ अशी पोस्टरबाजी सुरू केली.
देशासाठी कसलेच योगदान न देणारे संकटांचा काय सामना करणार? देशाचे नाव जगभर उंचावणाऱ्या पंतप्रधानांवर टीका करणे हीच का मातोश्रीची शिकवण? अशी बोचरी टीका भाजपाने सुरू केली आणि पवारांचा हेतू साध्य झाला. सेना भाजपात जेवढी म्हणून भांडणे होतील तेवढी ती पवारांना हवीच आहेत. राष्ट्रवादीच्या तंबूत अनेक नाववाले वाघ असले तरी त्यातले काही जायबंदी आणि काही पिंजऱ्यात बंद आहेत. त्यामुळे आपला पक्ष वाढवण्याची जबाबदारी १७ व्या वर्षात आणि वयाच्या पंचाहत्तरीत पुन्हा पवारांच्या खांद्यावर आली आहे.
राजकीय
मासळीबाजार
भाजपा-शिवसेनेचा घटस्फोट घडवून आणण्याची एकही
संधी पवारांना सोडलेली नाही आणि सत्तेत राहून सरकारच्या विरोधात बोलण्याची संधी शिवसेनेनेही सोडलेली नाही.
हा सगळा राजकीय मासळीबाजार पाहता मुंबईसाठी भाजपा-शिवसेनेने कोणती विकासाची कामे केली, हा सवालही कोणाच्या मनात येणारा नाही.
तो तसा येऊ नये याची सोय आज विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीनेच करून ठेवली आहे.