पुन्हा संततधार
By admin | Published: September 19, 2016 05:34 AM2016-09-19T05:34:16+5:302016-09-19T05:34:16+5:30
मध्य भारतासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मुंबई आणि राज्यातील पावसाचा जोर वाढतच आहे.
मुंबई : मध्य भारतासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मुंबई आणि राज्यातील पावसाचा जोर वाढतच आहे. गुरुवारपासून राज्यासह मुंबईत सुरू झालेल्या पावसाने उत्तरोत्तर चांगलाच जोर पकडला आहे. शुक्रवारसह शनिवारी आणि रविवारीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रविवारी सकाळपासून सायंकाळापर्यंत कोसळलेल्या पावसाने मुंबापुरीला चांगलेच झोडपून काढले. परिणामी, मुंबईकरांचा रविवार पाण्यात गेला असून, सोमवारीही पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिल्याने मुंबईकरांची पावसाळी कसरत सुरूच राहणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ३४.३५ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ४१.१० मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ४९.६८ मिलीमीटर पाऊस पडला. विशेषत: नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, प्रभादेवी, माहीम, लोअर परेल, दादर, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, घाटकोपर, पवई, भांडुप, मुलुंड, अंधेरी आणि गोरेगाव या परिसरात रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. पावसाचा जोर कायम राहिल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-कुर्ला रोड, घाटकोपर येथील असल्फा रोड आणि कुर्ला-सांताक्रुझ रोडवरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. तर महापालिका नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरात एके ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग पडला. शहरात ८, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ११, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ९ अशा एकूण २२ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)
>मच्छीमारांना इशारा
अरबी समुद्रातील वातावरणामुळे कोकणच्या किनाऱ्यावर वेगाने वारे वाहत असून, जोरदार पावसाचा मारा सुरू आहे. वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी
५५ किलोमीटर असून, समुद्र खवळलेला आहे. परिणामी, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये.
>मुंबईला इशारा
सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील.
>राज्याला इशारा
१९, २०, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल.
१९, २०, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडेल.
२१ आणि २२ सप्टेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल.
२२ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल.
२२ सप्टेंबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल.