तळोजातील प्रदूषणाबाबत पुन्हा आंदोलन; अहवालापूर्वीच कंपनीचे काम सुरू
By admin | Published: June 11, 2016 02:43 AM2016-06-11T02:43:41+5:302016-06-11T02:43:41+5:30
तळोजा औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे.
तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. या परिसरातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट व सिडकोचे डम्पिंग ग्राउंड हटविण्यात यावे, यासाठी स्थानिकांचा लढा सुरू आहे.
नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. याविरोधात २० जून रोजी सकाळी १0 वाजता रामिक कंपनीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा सद्गुरू वामन बाबा महाराज प्रदूषण विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्या आणि कारखान्यांच्या प्रदूषणामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषणात सर्वाधिक फटका घोट, चाल, नागझरी, घोटकॅम्प, तोंडरे, पेंधर, ढोंगरे पाडा, देवीचा पाडा, खेरणे, वलप, कानपोली, पाले खुर्द, चिंध्रन या गावातील नागरिकांना बसला आहे. नागरिकांना सततची सर्दी, डोकेदुखी, दम्याचे आजार, त्वचेचे आजार, तसेच स्त्रियांना वंध्यत्व यासारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे.
गेल्या महिन्यात याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी पनवेलचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी मध्यस्थी करून संबंधित अधिकारी व आंदोलनकर्त्यांची बैठक घेऊन प्रदूषण अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. समितीचा निकाल येईपर्यंत रामिकचे ३० एकरवर सुरू असलेले कामही बंद करावे, असे ठरले होते. मात्र त्यानंतरही काम सुरू राहिले आहे.