चुकीच्या दिशेने बाईक चालवण्याचा विरोध केल्याने तरुणाला भोसकले
By admin | Published: March 14, 2017 08:04 AM2017-03-14T08:04:15+5:302017-03-14T08:04:15+5:30
चुकीच्या दिशेने बाईक चालवणा-याचा विरोध केल्याने एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - चुकीच्या दिशेने बाईक चालवणा-याचा विरोध केल्याने एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. फर्ग्यूसन कॉलेज रोडवर हा प्रकार घडला. वाहतुकीच्या नियमांचं सर्रासपणे होणारं उल्लंघन अनेकदा जीवावर बेतण्याची शक्यता असते, मात्र नियम न पाळणा-यांचा विरोध केल्याने या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला आपला जीव धोक्यात घालावा लागला.
बाईकस्वाराने चाकूने भोसकल्यानंतर त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेलं. हडपसरमधील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती सध्या स्थिर आहे. 'चाकू हल्ला छातीपासून थोड्या अंतरावरच झाला, अन्यथा जीव जाण्याची शक्यता होती', अशी माहिती डेक्कन जिमखाना पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी बाईकस्वाराने घटनास्थळाहून पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सुओ मोटो तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तरुण आपल्या मित्रांसोबत फर्ग्यूसन कॉलेज रोडवरील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आला होता. रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान तो आपल्या मित्रांसोबत बाहेर आला. सर्वजण रस्त्यावर गप्पा मारत असताना एका दुचाकीस्वाराचा तरुणाला धक्का लागला. तरुणाने ओरडत त्याला वाहतुकीच्या नियमांचं पालन करायला सांगितलं. काही अंतर पुढे गेल्यावर दुचाकीस्वार थांबला आणि मागे वळून पाहू लागला. जाब विचारण्यासाठी तरुण पुढे गेला असता आपल्याकडील हत्याराने त्याने हल्ला केला'.
तरुणांच्या मित्रांना सुरुवातीला काही कळलंच नाही. त्याने हाताने बुक्की मारली असावी असं त्यांना वाटलं. मात्र रक्त पाहिल्यावर त्यांना अंदाज आला आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पोलीस सध्या आरोपी दुचाकीस्वाराचा शोध घेत आहे.