राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट

By Admin | Published: March 5, 2015 01:42 AM2015-03-05T01:42:46+5:302015-03-05T01:42:46+5:30

राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट अद्याप सरले नसून शनिवारपासून पुन्हा तो बरसण्याची शक्यता आहे.

Against the rain again in the state | राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट

googlenewsNext

पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट अद्याप सरले नसून शनिवारपासून पुन्हा तो बरसण्याची शक्यता आहे. तसेच रविवारी व सोमवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्याला भरलेली हुडहुडी बुधवारीही कामय होती. अनेक शहरांचे कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या खालीच होते.
देशावर निर्माण झालेली हवेची द्रोणीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरातील हवेचा कमी दाबाचा पट्टा पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात वाहू लागतील; त्यामुळे शनिवारपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसास सुरूवात होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यभरात पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी दिली.
गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. बुधवारी दिवसभरात राज्यात कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या तापमानात झालेली घट बुधवारी देखील कायम होती.
मध्य महाराष्ट्र, कोकण या शहरांचे कमाल तापमान ३० अंशाच्या खाली होते. तर विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान ३२ अंशाच्या आत होते. नाशिकचे कमाल तापमान सरासरीपेक्षा तब्बल ७.१ अंशांनी घटून २६.५ अंशापर्यंत खाली आले होते. पुणे, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, मालेगाव, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या शहरांचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंशापर्यंत कमी झाले होते.
यवतमाळचे किमान तापमान सरारीपेक्षा तब्बल ७.८ अंशांनी घटून ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा, मुंबई, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती या शहरांच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली.

महाबळेश्वरात दवबिंदू गोठले
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये थंडीच्या कडाक्यामुळे वेण्णा लेक परिसर ते लिंगमळापर्यंतच्या भागात दवबिंदू गोठल्यामुळे प्रचंड प्रमाणात हिमकण पाहावयास मिळाले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार शहरातील किमान तापमान आठ अंश सेल्सिअस होते. गेल्या चार वर्षांतील शहराचे हे सर्वांत कमी तापमान म्हणून याची नोंद झाली आहे. अवेळी पडलेल्या अशा थंडीच्या कडाक्यामुळे स्ट्रॉबेरीसारख्या नाजूक फळांचे काही प्रमाणात नुकसान झाले.

Web Title: Against the rain again in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.