महायुतीत बेबनाव? भाजपाच्या मित्रपक्षानेच जाळला राज्य सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 02:11 PM2023-09-18T14:11:40+5:302023-09-18T14:12:10+5:30
Maharashtra Politics: नेमके प्रकरण काय?
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे महायुतीचे सरकार कारभार पाहू लागले. आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यात आंदोलने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरून समाज आक्रमक झाल्याचे दिसत असून, दुसरीकडे विविध मुद्द्यांवरून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच महायुतीत बेबनाव आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण भाजपच्या एका मित्रपक्षाने राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. सरकोली ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे रयत क्रांती संघंटनेच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. ऊस बंदीच्या निर्णयाविरोधात रयत क्रांती संघटनेने राज्यभर सहकार मंत्र्यांचा पुतळा जाळो आंदोलन केले.
रयत क्रांती संघटनेने केले सहकार मंत्र्यांचा पुतळा जाळो आंदोलन
राज्य सरकारने या वर्षीच्या हंगामात ऊसावर झोनबंदी लावली आहे. १९९६ साली राज्य सरकारने झोनबंदी लावली होती. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी झोनबंदी उठवून ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पायातील बेड्या काढल्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या नेतृत्वाखालील राजकारण करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झोनबंदी लावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
दरम्यान, एका बाजूला ऊसाचे उत्पादन घटले आहे. ऊत्पादन खर्च वाढला असताना ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे ,मजुरी वाढली, खताच्या किमती चौपट झाल्या आहेत. नागंरटीचा खर्च वाढला आहे त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नाही. आता सरकारने ऊसाचा FRP प्रती टन पाच हजार भाव जाहीर करावा. नाहीतर झोनबंदी उठवावी जर झोनबंदी नाही उठवली तर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील वाजत गाजत बाहेरच्या राज्यात ऊस घेऊन जावू, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सरकारला आवाहन केले आहे.