अग्रवाल, दीपचंद यांना अटक होणार?
By admin | Published: April 16, 2017 02:14 AM2017-04-16T02:14:47+5:302017-04-16T02:14:47+5:30
आर्टिलरी सेंटरमधील लष्करी जवान डीएस रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली ‘द क्विंट’ या वेबसाइटची
नाशिक : आर्टिलरी सेंटरमधील लष्करी जवान डीएस रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली ‘द क्विंट’ या वेबसाइटची पत्रकार संशयित पूनम अग्रवाल (रा़ नवी दिल्ली) व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद कश्मिरसिंग कयात यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एस़ पठाण यांनी शनिवारी फेटाळला़ त्यामुळे दोघांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी न्यायालयात जामिनास तीव्र विरोध केला़ पत्रकार अग्रवाल व लष्करी अधिकारी दीपचंद यांनी फेब्रुवारीमध्ये ‘बडीज ड्युटी’च्या नावाखाली केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये लष्करी जवान मॅथ्यू यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडून जवानांच्या पिळवणुकीबाबत तक्रार केली होती़ या दोघांनी या स्टिंगसाठी बेकायदेशीररीत्या लष्करी हद्दीत प्रवेश करून, जवानांचे फोटो व व्हिडीओ क्लिप काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केली़ या क्लिपमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीला दिल्या जाणाऱ्या सहायक कर्मचाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या घरातील मुलांची शाळेत ने-आण करणे, कुत्र्याला फिरवून आणणे, कपडे धुणे अशी कामे करावी लागत असल्याचे चित्रफितीतून समोर आले होते.
सोशल मीडियावर हे स्टिंग व्हायरल झाल्यानंतर आपले कोर्ट मार्शल होईल, अशी भीती लान्सनायक तथा सहायक पदावर कार्यरत असलेले डीएस रॉय मॅथ्यू यांनी त्या व्हिडीओत व्यक्त केली होती. त्यानंतर, २४ फेब्रुवारीपासून ते बेपत्ता होते. २ मार्च २०१७ रोजी मॅथ्यू यांचा गळफास घेतलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बराकीमध्ये आढळून आला़ मॅथ्यू यांनी स्टिंग आॅपरेशनमुळे आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले़ (प्रतिनिधी)
बड्या वकिलांची हजेरी
पत्रकार अग्रवाल व दीपचंद यांच्या अटकपूर्व जामिनावर शनिवारी युक्तिवाद झाला़ त्यांच्या युक्तिवादासाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयातील चार ते पाच ज्येष्ठ वकील जिल्हा न्यायालयात आले होते़ मात्र, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत, न्यायाधीश पठाण यांनी जामीन फेटाळला़