अगरवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: April 29, 2016 12:59 AM2016-04-29T00:59:20+5:302016-04-29T00:59:20+5:30
मेपलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी गुरुवारी फेटाळला.
पुणे : पाच लाख रुपयांत घरप्रकरणी मेपलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी गुरुवारी फेटाळला. दरम्यान, पीएमआरडीए आणि आणखी संबंधित विभागाकडे चौकशी केल्यानंतर अगरवाल यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता ४६८, ४६९, ४७०, ४७१ आणि ४०९ ही कलमे वाढविण्यात आली आहेत.
सचिन अगरवाल यांच्यासह नवीन अशोक अगरवाल, सेल्स मॅनेजर प्रियंका अगरवाल यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रुपच्या संचालक आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करुन सामान्य जनतेची दिशाभूल केली. नोंदणीसाठी नागरिकांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सचिन अगरवाल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी अगरवाल यांच्या जामिनास जोरदार विरोध केला. हा सर्वांत मोठा घरकुल घोटाळा आहे. अगरवाल यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लोगो वापरण्याबरोबरच गैरवापर केला आहे. योजनेसाठी सरकारची प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच म्हाडाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. तसेच, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत पैसे गुंतवा, अशी कोणतीही तरतूद नसल्याने आरोपींनी अनेकांना फसविले आहे. त्यामुळे अगरवाल यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी पवार यांनी केली. योजनेच्या माध्यमातून नागरिकांकडून घेण्यात आलेले पैसै परत करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १३ हजार नागरिकांचे पैसे परत करण्यात आल्याने, अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर मंचाने अगरवाल यांचा जामीन अर्ज फेटाळला.(प्रतिनिधी)