वय वर्षे 37 अन् पगार घेतो 78 कोटी; सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्या तरुणांमध्ये लातूरचे अभय भुतडा देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 07:16 AM2023-08-12T07:16:30+5:302023-08-12T07:16:42+5:30
अभय भुतडा यांनी आजवर पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक, व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले असून, सध्या ते पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : देशात सर्वाधिक वेतन मिळविणाऱ्यांच्या यादीत चौथ्या, तर ४० पेक्षा कमी वयोगटात प्रथम क्रमांकावर लातूरचे अभय सुरेशचंद्र भुतडा यांचे नाव झळकले आहे. त्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ७८.१ कोटी रुपये इतके वेतन मिळविले. ३७ वर्षीय अभय भुतडा यांनी आजवर पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक, व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले असून, सध्या ते पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत.
‘ए ए प्लस’चे रेटिंग पहिल्याच वर्षात
भुतडा यांच्या अधिपत्याखाली कंपनीने प्रथम वर्षातच नफा मिळवत केअर रेटिंग्स लिमिटेडकडून ‘ए ए प्लस’चे क्रेडिट रेटिंग मिळविले.
उद्योग व्यवसायाचे डिजिटलायझेशन, जोखीम व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, तसेच नवे व्यवसाय विकसित करण्याला त्यांनी प्राधान्य दिले.
नोकरी करत शिक्षण, उद्योगात भरारी
n अभय यांचे वडील सुरेशचंद्र भुतडा हे लातूरमध्ये किराणा व्यवसायातील मोठे व्यापारी आहेत. अभय यांनी लातूरच्या व्यंकटेश विद्यालयात व राजर्षी शाहू महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च शिक्षण पुण्यात पूर्ण केले. ते सीए झाले.
n विशेष म्हणजे त्यांनी नोकरी करत उच्च शिक्षण पूर्ण केले. वडील सुरेशचंद्र, आई सरोजादेवी, पत्नी तृप्ती, भाऊ विनय, आशुतोष तसेच चुलते लक्ष्मीरमण व रमेश भुतडा यांचा स्नेह व पाठबळ अभय यांच्यासाठी प्रेरणादायी राहिले आहे.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही योगदान
आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत सीएसआरद्वारे त्यांनी योगदान दिले आहे. उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी अभय यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.