मुलाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी वृद्ध पित्याची धडपड अद्याप सुरूच,पोलिसांना पाझर फुटेना..
By admin | Published: May 11, 2017 03:09 AM2017-05-11T03:09:16+5:302017-05-11T03:09:16+5:30
उच्चशिक्षित आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी विक्रोळीतील एक वृद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उच्चशिक्षित आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी विक्रोळीतील एक वृद्ध रहिवासी जवळपास एक महिन्यापासून ठाणे पोलिसांच्या पायऱ्या झिजवत आहे. पोलीस यंत्रणा मात्र चौकशीस टाळाटाळ करीत असून असंवेदनशीलतेचा हा कळस असल्याचा आरोप या ज्येष्ठ नागरिकाने केला आहे.
ठाण्यातील बाळकुम परिसरातील रिजन्सी सोसायटीचे रहिवासी विनायक लोंढे यांचा १५ एप्रिल रोजी रात्री उशिरा गूढ मृत्यू झाला. एमबीए, एमकॉम शिकलेल्या विनायकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या सोसायटीतील एका रहिवाशाने विनायकचे भाऊ प्रमोद यांना १५ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मोबाइल फोनद्वारे दिली. प्रमोद आणि त्यांचे वडील सुग्रीव लोंढे लगेच विक्रोळी येथून ठाण्याकडे निघाले. या प्रकरणामध्ये कापूरबावडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी विनायकच्या वडिलांनी त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे काही तक्रारी केल्या असून आरोपांच्या पृष्ट्यर्थ बरेचशे मुद्देही मांडले आहेत. त्यानुसार, ३४ वर्षीय विनायकने प्रेमविवाह केला होता. पत्नी पूनमसोबत त्याचे अनेक कारणांवरून नेहमी वाद होत असत. विनायक एका मार्केटिंग कंपनीसोबत जुळला होता. १५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत तो सहकाऱ्यांशी मोबाइल फोनवर बोलून त्यांना कामासंदर्भात प्रोत्साहन देत होता. त्यानंतर, पूनमने विनायकशी जोरदार भांडण केल्याची माहिती त्यांना शेजाऱ्यांकडून मिळाली. या भांडणानंतर विनायकने सरळ गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे.
शासकीय रुग्णालयात विनायकची शवचिकित्सा त्याचे वडील आणि भावाच्या अनुपस्थितीत करण्यात आली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा शवचिकित्सा करण्याचा निर्णय घेतला. विनायकच्या सासऱ्यांनी मात्र त्यावर आक्षेप घेऊन मृतदेह नेण्यासाठी घाई केल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. मृतदेह घरी नेण्यासाठी विनायकच्या पत्नीला लोंढे यांनी घराची चावी मागितली. त्यासाठीही टाळाटाळ केल्याने त्यांचा पुरावे नष्ट करण्याचा विचार होता की काय, असा प्रश्नही लोंढे यांनी केला आहे. लोंढे यांनी विनायकच्या सोसायटीत चौकशी केली असता घटनेच्या दिवशीही पूनम विनायकशी मोठ्या आवाजात भांडत होती, अशीही माहिती त्यांना मिळाली. एकूणच परिस्थिती विचारात घेतल्यास विनायकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाट संशय लोंढे यांना आहे.
पोलिसांना पाझर फुटेना...-
विनायकने गळफास घेतलेल्या बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. अशा स्थितीत त्याच्या पत्नीने विनायकला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही, विनायकने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या रस्सीचा अर्धा तुकडा कुठे आहे, त्याची विल्हेवाट कुणी लावली, विनायकच्या मोबाइल फोनमधील ‘कॉल लॉग’शी छेडछाड कुणी केली, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून हे गूढ उकलण्यासाठी सुग्रीव लोंढे आणि त्यांचा मुलगा प्रमोद यांनीकापूरबावडी पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्तालयापर्यंतच्या पायऱ्या झिजवल्या. परंतु, पोलिसांच्या मनाला अद्याप पाझर फुटला नाही.