रेशनिंग कार्यालयासमोर ‘एजंटगिरी’

By admin | Published: January 11, 2017 03:24 AM2017-01-11T03:24:08+5:302017-01-11T03:24:08+5:30

रेशनिंग कार्यालय परिसरात प्रवेश करताच काय काम आहे? इकडे या, कागदपत्रे बघू. मी तुमचे काम करुन देतो. लवकरात लवकर रेशन कार्ड मिळेल

Agent Giri in front of the Rationing Office | रेशनिंग कार्यालयासमोर ‘एजंटगिरी’

रेशनिंग कार्यालयासमोर ‘एजंटगिरी’

Next

पिंपरी : रेशनिंग कार्यालय परिसरात प्रवेश करताच काय काम आहे? इकडे या, कागदपत्रे बघू. मी तुमचे काम करुन देतो. लवकरात लवकर रेशन कार्ड मिळेल, अशी वाक्ये निगडीतील परिमंडल अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ऐकायला मिळत आहेत. रेशनकार्डमध्ये नाव टाकणे, कमी करणे तीनशे रुपये; तर कार्ड विभक्त करण्यासाठी पंधराशे रुपये असा दर एजंटांकडून सांगितला जात असून, एजंटांकडून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले.
निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुल येथे असलेले रेशनिंगचे कार्यालय एजंटांच्या विळख्यात अडकले आहे.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयात जात असताना एजंटांचाच सामना करावा लागत आहे. कार्यालयात पोहोचत असताना रस्त्यातच नागरिकांना अडविले जाते.
कार्यालयातून काम करवून घ्यायचे असल्यास जास्त दिवस लागतील, असे सांगितले जाते. यासह आमच्याकडे काम दिल्यास किती रकमेत होईल, हेदेखील एजंटांकडून आवर्जून सांगितले जाते. यातून एकप्रकारे एजंटांकडून जणूकाही व्यवहारच सुरु असतो.
कार्यालय परिसरात एजंटांचा घोळका बसलेला असतो. कोणत्याही कामासाठी एखादा नागरिक आला, तरी त्यास त्या ठिकाणी थांबवून विचारपूस केली जाते. येथे येणाऱ्या नागरिकांना एजंटांचा अक्षरश: गराडा पडतो. यामुळे नागरिकही गोंधळून जातात.
दोन-तीन कागदपत्रात काम...
 नाव समाविष्ट करण्यासाठी कमी केल्याचा दाखला आणा, यासह दोन-तीन कागदपत्रे घेऊन काम करुन देते असे सांगण्यात आले. प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधून कार्यालयाच्या दिशेने गेला असता काही अंतरावरच महिला एजंटांचा घोळका बसलेला दिसून आला. या ठिकाणी एजंट व त्यांच्याकडे आलेले काही नागरिक चर्चा करीत होते. कोणत्या कामासाठी किती पैसे लागतील, किती दिवसात तुमचे काम होईल, याबाबत त्यांना सांगितले जात होते.
काय, रेशनकार्ड काढायचंय का?
 परिमंडल कार्यालयात जाण्यासाठी जीना चढत असतानाच जीन्याशेजारी बसलेल्या तीन महिलांपैैकी एकीने ‘काय, रेशन कार्ड काढायचंय का’, असे प्रतिनिधीला विचारले. कोणती कागदपत्रे लागतील असे विचारल्यावर त्या महिलेने एका कागदावर कागदपत्रांची यादी आणि मोबाइल क्रमांक लिहून दिला. पैसे किती लागतील असे विचारल्यास २००० हजार रुपये सांगण्यात आले. रेशन कार्ड विभक्त करायचे आहे, असे विचारले असता आम्ही करून देऊ असे सांगितले.
मंगळवार, दुपारी १२.४०
 रेशनिंग कार्यालयाकडे जात असतानाच इमारतीच्या तळमजल्यातच पायऱ्यांवर मधोमध एक महिला एजंट बसलेली होती. दोन महिलांसोबत तिचे शिधापत्रिकेच्या कामाबाबत बोलणे सुरु होते. त्या महिलांकडून एजंटनी एका कामाचे दोनशे रुपये घेतले. प्रतिनिधीलाही विचारणा झाली. काय काम आहे? करुन देते, असे सांगण्यात आले. शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करण्यासाठी तीनशे रुपये तर विभक्त करण्यासाठी पंधराशे रुपये सांगण्यात आले.
रेटकार्ड वेगवेगळे
 रेशन कार्ड कोणत्या परिसरातील काढायचे आहे, त्यानुसार एजंट पैैसे आकारत असतात. प्राधिकरण परिसरातील रेशनकार्ड काढायचे असेल, तर १५०० रुपये आणि ओटा स्कीम परिसरासाठी २००० हजार रुपये द्यावे लागतील, असे तेथील एजंटांनी सांगितले. याशिवाय रेशनकार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे कागदपत्रे अपुरी असतील तर प्रत्येक कागदपत्रामागे ३०० ते ५०० रुपये घेतले जातात.

शिधापत्रिकेबाबतचे काम करण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकाला कार्यालयापर्यंत पोहोचूच दिले जात नाही, अशी स्थिती आहे. कार्यालयात पोहोचण्याआधीच संबंधित नागरिकाला गराडा घालून भांबावून सोडले जाते. पावलोपावली एजंट बसलेले असतात.
- शामराव जाधव, नागरिक

संकलन : योगेश्वर माडगूळकर,
मंगेश पांडे, अनिल पवळ,
अतुल मारवाडी

Web Title: Agent Giri in front of the Rationing Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.