एजंट गायब, रास्त भाव दुकानांवर छापे
By admin | Published: May 20, 2016 02:29 AM2016-05-20T02:29:42+5:302016-05-20T02:29:42+5:30
शिधापत्रिका कार्यालय (परिमंडल-अ) परिसरातील एजंटगिरीविषयी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे यंत्रणा हडबडली आहे.
पिंपरी : शिधापत्रिका कार्यालय (परिमंडल-अ) परिसरातील एजंटगिरीविषयी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे यंत्रणा हडबडली आहे. एजंट गायब झाले आहेत. अन्नधान्य वितरण विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली असून दापोडी, बोपोडीतील दुकानांवर छापे टाकून तपासणी केली.
निगडी कार्यालयातील एजंटगिरीविरोधात वृत्त प्रसिद्ध होताच विविधस्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दररोज अधिकाऱ्यांच्या टेबलापर्यंत जाणारे एजंट आज दिसले नाहीत. दुपारी एक महिला एजंट कार्यालय इमारतीच्या ठिकाणी आली होती. दरम्यान, लोकमत प्रतिनिधीने रेशन कार्ड काढण्याबाबत त्या महिलेकडे विचारपूस केली. मात्र, धास्तावलेल्या महिलेने आपण एजंट वगैरे काही नसल्याचे सांगून काढता पाय घेतला. दापोडी, खडकीतही छापे टाकले. धान्याचा साठा करणाऱ्या आर. पी. कर्नावट यांच्या दुकानाची तपासणी केली. त्या दुकानात ९१ क्विंटल गहू, ३६ किलो तांदूळ साठा आढळला. संबंधित मालाच्या नोंदी नव्हत्या. त्याच ठिकाणचे डी. पी. कर्नावट यांच्याही दुकानाची तपासणी केली. तिथेही मालाच्या नोंदी नव्हत्या. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्याचा कांगावा
एजंटांना आम्ही थारा देत नाही. एजंटांबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. लेखी पत्रे दिली आहेत, असा कांगावा अधिकारी एस. ए. शिंदे यांनी केला. कार्यालयाबाहेर काय चालते, त्याच्याशी आपला संबंध येत नाही, असे सांगून जबाबदारी झटकली.