आरक्षणासाठी धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा; "सरकारनं शब्द पाळला नाही, उद्यापासून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 01:33 PM2023-11-15T13:33:23+5:302023-11-15T13:34:26+5:30
आज ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणाच्या निर्णयाबाबत एकही पाऊल टाकले नाही असा आरोप धनगर समाजाने केला.
अहमदनगर – राज्यात एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतोय तर दुसरीकडे धनगर समाजानेही सरकारला इशारा दिला आहे. १६ तारखेपासून धनगर समाजातील कार्यकर्ते आमरण उपोषण करणार आहेत. यशवंत सेनेने चौंडी इथं २१ दिवसांचे उपोषण केले होते त्यावेळी सरकारने धनगर समाजाला लिखित आश्वासन दिले, परंतु दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत यशवंत सेनेने आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले की, ५० दिवसांत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं. त्यामुळे सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवत धनगर समाजाचा गेल्या ७५ वर्षांचा वनवास दूर होईल. दिवाळी गोड होईल अशी आशा होती. परंतु या राज्य सरकराने धनगर बांधवांची क्रूर थट्टा केली आहे. आज ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणाच्या निर्णयाबाबत एकही पाऊल टाकले नाही. त्यामुळे उद्यापासून पुन्हा आम्ही आमरण उपोषणाला बसत आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच चौंडीत आमरण उपोषणाला सुरुवात होईल पण त्याचे प्रतिबिंब राज्यातील प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात उमटलेले दिसेल. १५-२० ठिकाणी साखळी उपोषण सुरू होईल. धनगर बांधव पुढाऱ्यांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येईल. धनगर हा ओबीसीतील सर्वात मोठा घटक आहे. परंतु कुठल्याच ओबीसी नेत्याने धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही. स्पष्ट भूमिका मांडली नाही. १७ तारखेला ओबीसींचा मेळावा होतोय, त्यात धनगर आरक्षणाला ओबीसी नेत्यांनीज पाठिंबा द्यावा अन्यथा या पुढे आम्हाला गृहित धरू नका असं आव्हान बाळासाहेब दोडतले यांनी दिले आहे.
दरम्यान, धनगर समाजाला सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. राज्यात धनगर समाज हा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे. त्याचा हा अपमान आहे. मधल्या काळात बैठका घेते, वेगळी भूमिका घेते आणि प्रत्यक्षात वेगळा निर्णय घेते. त्यामुळे राज्य सरकारबद्दल धनगर समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्याचे पडसाद येणाऱ्या काळात राज्यात दिसतील. धनगरांच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल. धनगर समाजाचे युवक गावात पुढाऱ्यांना फिरू देणार नाही असा इशाराही यशवंत सेनेने दिला आहे.