सांगलीतील कोथळे खून खटला वकील न दिल्याने लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:37 AM2018-04-27T01:37:18+5:302018-04-27T01:37:18+5:30
उज्ज्वल निकम; पुढील सुनावणी ११ मे रोजी
सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सातही संशयितांनी अजून वकील न दिल्याने हा खटला लांबणीवर पडला आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषारोपपत्राची सर्व माहिती घेतली. मुख्य संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याने न्यायालयास पत्र लिहून पोलीस कोठडीचे रजिस्टर व स्वत:च्या कॉल डिटेल्सची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
अनिकेत कोथळे खून खटला व हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून खटल्यात निकम यांची नियुक्ती झाली आहे. या दोन्ही खटल्याच्या सुनावणीसाठी ते गुरुवारी सांगलीत आले होते. कोथळे खून खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात संशयित आहेत. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. एकाही संशयिताने वकील न दिल्याने खटल्याची अजूनही सुनावणी सुरू होऊ शकली नाही. निकम यांनी सीआयडीचे पोलीस उपअपधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. साक्षीदार किती आहेत? त्यांचे जबाब नोंदविले आहेत का? याचीही माहिती घेतली. त्यानंतर ते बारा वाजता जिल्हा न्यायालयात दाखल झाले. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात कोथळे खटल्याची सुनावणी होती. पुढील सुनावणी ११ मे रोजी ठेवण्यात आली आहे.
हिवरे तिहेरी खून खटल्याची ११ मे रोजी सुनावणी
हिवरेतील तीन महिलांच्या खून खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. साक्षीदारांनी यादी तयार करून सुनावणीची तारीख निश्चित करण्याचा निर्णय झाला. यासाठी ११ मे रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.